चामोर्शी तालुक्यात मलेरियाचे थैमान
By Admin | Updated: November 26, 2014 23:05 IST2014-11-26T23:05:41+5:302014-11-26T23:05:41+5:30
चामोर्शी तालुक्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यापाठोपाठ आता संपूर्ण तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

चामोर्शी तालुक्यात मलेरियाचे थैमान
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यापाठोपाठ आता संपूर्ण तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
२६ नोव्हेंबरपूर्वी चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात ४४ रूग्ण दाखल होते. २६ नोव्हेंबर रोजी या रूग्णालयात नव्याने २६ रूग्ण दाखल झाले. यात ४४ रूग्णांमध्ये २० रूग्ण मलेरियाग्रस्त आहे. आज बुधवारी ग्रामीण रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांमध्ये संजित बिश्वास (३५), निलेश वैरागी (२), रेवा शांती शील (५०), शुबेन हालदार (१९), यशोदा हालदार (५०), रायलक्ष्मी बिश्वास (३०), निर्माण माझी (२७), तपन मंडल (३४) सर्व रा. विकासपल्ली यांचा समावेश आहे. या रूग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. देवरी हे एकमेव डॉक्टर कार्यरत असून ते दिवसरात्र येथील रूग्णांवर औषधोपचार करीत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागदेवते यांना शासकीय आदेशानुसार विविध ठिकाणी दौरे करावे लागतात. त्यामुळे एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संपूर्ण रूग्णालयाच्या आरोग्य सेवेचा भार पडला आहे. चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी व एक वैद्यकीय अधीक्षकांचे पद मंजूर आहेत. यापैकी सद्य:स्थितीत या रूग्णालयात केवळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. या रूग्णालयात दररोज २५० ते ३०० रूग्ण तपासणीसाठी बाह्य रूग्ण विभागात येत असतात. बाह्य रूग्ण विभागात येत असलेल्या रूग्णांमध्ये अधिकाधिक रूग्ण संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असल्याने त्यांना त्यांची तपासणी करणे एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणीचे जात आहे. चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात तत्काळ दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. याशिवाय या रूग्णालयात अपघातग्रस्त रूग्णांची भर पडत असल्याने रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या रूग्णालयाच्या आरोग्य सेवेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)