गडचिरोलीसाठी जलयुक्तचा तीन वर्षांचा विशेष आराखडा बनवा

By Admin | Updated: December 19, 2015 01:23 IST2015-12-19T01:23:42+5:302015-12-19T01:23:42+5:30

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्र असल्याने सिंचन प्रकल्पांना मर्यादा आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत...

Make a three-year special plan for Gadchiroli | गडचिरोलीसाठी जलयुक्तचा तीन वर्षांचा विशेष आराखडा बनवा

गडचिरोलीसाठी जलयुक्तचा तीन वर्षांचा विशेष आराखडा बनवा

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : खास बाब अंतर्गत ५० हजार सिंचन विहिरी उभारा
गडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्र असल्याने सिंचन प्रकल्पांना मर्यादा आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तीन वर्षांचा विशेष कृती आराखडा बनवून जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी तसेच या काळात गडचिरोली जिल्ह्यात ५० हजार विहिरींची कामे खास बाब म्हणून घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले.
नागपूरच्या विधानभवनात गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे तसेच राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात भूजल पातळी खूप उत्तम आहे. ती अधिक वाढवून भूस्तरापर्यंत जलस्तर उंचावणे शक्य आहे. याचा अभ्यास करुन माथा ते पायथा पद्धतीने पाणलोट विकास करण्याचे नियोजन जलयुक्त शिवार कार्यक्रमात करा व याचा तीन वर्षांचा विशेष आराखडा सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे निश्चित करताना लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेण्याच्या दृष्टीकोणातून या नियोजनासाठी मतदारसंघानिहाय बैठका घ्याव्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सिंचन क्षमता वाढीसाठी जिल्ह्यात ५० हजार विहिरींची क्षमता मान्य करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यासाठी प्रस्ताव सादर करावा असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यामध्ये ७ लक्ष २५ हजार मेट्रीक टन धान खरेदी दरवर्षी होते. मात्र साठवण क्षमता याच्या निम्मी आहे. त्यामुळे ८९ गोदामांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे. १० कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधीही वितरित झालेला आहे यातून क्षमता वाढणार आहे. सोबतच धान वाहतुकीचे दर लवकर अंतिम करुन येईल तसे धान खरेदी करण्याची पद्धत पुन्हा सुरु करा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी केली.
या बैठकीला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Make a three-year special plan for Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.