यात्रेसाठी योग्य नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 01:50 IST2016-01-16T01:50:53+5:302016-01-16T01:50:53+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्चपासून यात्रा प्रारंभ होणार आहे.

यात्रेसाठी योग्य नियोजन करा
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : मार्कंड्यात झाली आढावा बैठक
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्चपासून यात्रा प्रारंभ होणार आहे. १० दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी योग्य नियोजन करून भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावे, असे निर्देश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिले.
मार्र्कंडादेव येथे गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर उपाध्यक्ष मनोज पालारपवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे आदी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती, ग्रामपंचायत मार्कंडा, जि.प. बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन मंडळ, आरोग्य विभाग, महावितरण कंपनी, आपत्ती व्यवस्थापन केंद्र वन विभाग, पोलीस विभाग यांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार यासाठी विशेष व्यवस्था करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विदर्भाच्या विविध भागासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे बसगाड्यांची व्यवस्था तसेच फिरत्या मोबाईल शौचालयाची व्यवस्था ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.