महिला समृद्धीचे काम जागरूकतेने करा

By Admin | Updated: February 15, 2015 01:09 IST2015-02-15T01:09:05+5:302015-02-15T01:09:05+5:30

पुरूषासोबतच महिलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान असणे आजच्या काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी महिलांनी स्वत: जागृत राहिले पाहिजे.

Make awareness of women's prosperity | महिला समृद्धीचे काम जागरूकतेने करा

महिला समृद्धीचे काम जागरूकतेने करा

गडचिरोली : पुरूषासोबतच महिलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान असणे आजच्या काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी महिलांनी स्वत: जागृत राहिले पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यातील महिलांची खऱ्या अर्थाने आर्थिक समृध्दी होण्यासाठी सर्वांनीच जागरूकतेने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणेचे मुख्य महाप्रबंधक डॉ. यू. एस. साहा यांनी केले.
दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या मुख्य शाखेच्या सभागृहात आयोजित महिला समृध्दी योजनेंतर्गत मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डच्या पुणे कार्यालयाचे विकास व्यवस्थापक सुधीर धनविजय, बँक आॅफ इंडिया शाखेचे जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिलारे, गडचिरोली येथील नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक कृष्णा कोल्हे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. बळवंत लाकडे, संचालक खुशाल वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना यू. एस. साहा म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विपरित परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात तळागाळातील व दुर्गम भागातील लोकांना जिल्हा बँकेशी जोडून आर्थिक व्यवहारात व बचतीत मोलाचा सहभाग नोंदविला. यातून दुर्गम भागातील पुरूष व महिला ग्राहकांना बचतीची सवय लागली.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच महिला बचत गटांच्या पाठीशी राहिली आहे. यापुढेही राहिल.
यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिलारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक कृष्णा कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार, संचालन व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Make awareness of women's prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.