आरमोरी क्षेत्रात महायुती वरचढ

By Admin | Updated: June 9, 2014 23:37 IST2014-06-09T23:37:16+5:302014-06-09T23:37:16+5:30

मागील १0 वर्षांपासून आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे आनंदराव गेडाम हे आमदार आहेत. मात्र आमदारांचा पक्षांतर्गतविरोध आणि सामान्य नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका काँग्रेसला गेल्या पाच

Majority in Armory area | आरमोरी क्षेत्रात महायुती वरचढ

आरमोरी क्षेत्रात महायुती वरचढ

अभिनय खोपडे - आरमोरी
मागील १0 वर्षांपासून आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे आनंदराव गेडाम हे आमदार आहेत. मात्र आमदारांचा पक्षांतर्गतविरोध आणि सामान्य नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीचा  फटका काँग्रेसला गेल्या पाच वर्षांपासून बसत आहे. त्यामुळे  आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे कठोर आव्हान महायुतीचे राहणार आहे. काँग्रेसच्या विजयासाठी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांची भूमिका या वेळीही महत्वाची राहणार आहे.
कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी व धानोरा तालुक्याचे दोन महसूल साझे अशा सर्व भागाचा मिळून आरमोरी विधानसभा मतदार संघ आहे.  या मतदार संघात शहरी व ग्रामीण असे दोनही भाग येतात. मागील १0 वर्षापासून काँग्रेसचे आनंदराव गेडाम या भागाचे प्रतिनिधीत्व करतात. परंतु १0 वर्षात सांगण्यासारखे एकही ठोस काम या मतदार संघात झालेले नाही. १५  वर्षांपूर्वी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मंजूर झालेले कोसरी व येंगलखेडा या दोन सिंचन प्रकल्पाचे कामही पूर्ण होऊ शकलेले नाही.
या भागात एकही मोठा उद्योग आमदार गेडाम आणू शकलेले नाहीत. देसाईगंज हे नगर पालिका असलेले जुने व महत्वाचे व्यापारी पेठ आहे. येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्याच्या कामातही आमदारांनी रस घेतला नाही. तसेच याच गावात बसस्थानकसुध्दा निर्माण करू शकलेले नाही. केवळ आमदार फंडातून काँक्रीट रस्ते, मोर्‍या व समाज भवन यांचेच भरगच्च कामे आमदार गेडाम यांच्या खात्यावर नोंद आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा अरविंद सावकार पोरेड्डीवार गट सक्रिय आहे. याच गटाच्या हाती पक्षाची धुरा आहे. त्यांचेच पाच ते सहा जिल्हा परिषद सदस्य आहेत. कुरखेडा, आरमोरी व वडसा या तीन पंचायत समित्या काँग्रेसच्या हाती आहे. १0 वर्षात आमदार गेडाम यांनी पोरेड्डीवारांच्या गटाला समांतर आपलेही कार्यकर्ते गावागावात निर्माण केले आहेत.
२00९ च्या विधानसभा निवडणुकीत आनंदराव गेडाम साडेचार हजाराच्या मताधिक्याने निसटता विजय मिळवित विधानसभेत पोहोचले. त्यावेळी शिवसेनेत झालेली गटबाजी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर रिंगणात असल्याने आनंदराव गेडाम यांचे काम फत्ते झाले होते. शिवाय अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्याने अगदी अखेरच्या क्षणी प्रकाश पोरेड्डीवार यांनी मतदार संघात जनसंपर्क करून आनंदराव गेडाम यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. मात्र गेल्या साडेचार वर्षात पुलाखालून भरपूर पाणी निघून गेले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ सहकार नेत्यांना राहूल गांधीच्या वडसा येथील सभेत मंचावर स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे सहकार गटावर वर्चस्व ठेवणार्‍या पोरेड्डीवारांचे सर्मथक काँग्रेसच्या प्रचारातून बाहेरच झाले होते. केवळ आमदार आनंदराव गेडाम व देसाईगंज पंचायत समितीचे सभापती परसराम टिकले यांनीच काँग्रेसचा  प्रचार केला व काँग्रेसला ४३ हजाराचा फटका या मतदार संघात बसला. यावरून आनंदराव गेडाम यांची मतदार संघात कोणत्या दिशेने हवा सुरू आहे. याचा प्रत्यंत्तर येतो. त्यामुळे काँग्रेसच्या विजयासाठी पोरेड्डीवारांना पुन्हा कंबर कसावी लागणार आहे. आमदार गेडाम यांच्या उमेदवारीसाठी पोरेड्डीवार किती ताकद लावतात हे ही येणार्‍या काळात पाहावे लागणार आहे.
महायुतीकडून शिवसेनेचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना, भाजप सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून साखरपाणी होऊन आहेत. या मतदार संघात युवाशक्ती आघाडीचेही चांगले वर्चस्व आहे. युवाशक्ती आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्मथन केले होते. त्या मोबदल्यात हा मतदार संघ आपल्याला द्यावा, अशी त्यांची डिमांड होती.
आगामी काळात ही डिमांड पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा मतदार संघ सेनेकडेच राहिल, असे सेनेचे नेते सांगतात. काहीही परिस्थिती असली तरी विद्यमान काँग्रेस आमदाराप्रती असलेली नाराजी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या तंबूत अनेकांचे पोरेड्डीवारांच्या भूमिकेवर लक्ष्य राहणार आहे. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून आमदार गेडाम यांचा पर्याय म्हणून सेवानवृत्त सनदी अधिकारी एन. बी. वटी यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात आहे. तर युवाशक्ती आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर यांचेही नाव जोरात आहे.
 

Web Title: Majority in Armory area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.