Maharashtra Election 2019 ; १९८१ मध्ये पहिल्यांदा झाला होता ईव्हीएमचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:30+5:30
ईव्हीएमचा वापर करण्यापूर्वी मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जात होती. मतदाराला मतपत्रिका उपलब्ध करून दिली जात होती. या मतपत्रिकेवर उमेदवाराचे चिन्ह राहत होते. चिन्हासमोर शिक्का मारून मतदान करावे लागत होते. मतदान केलेली मतपत्रिका एका पेटीत टाकल्या जात होत्या.

Maharashtra Election 2019 ; १९८१ मध्ये पहिल्यांदा झाला होता ईव्हीएमचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निवडणूक प्रक्रिया अतिशय सुलभ व पारदर्शक करण्यात ईव्हीएमचा मोठा वाटा आहे. या ईव्हीएम मशीनचा पहिला प्रयोग १९८१ मध्ये केरळ राज्यातील परूर विधानसभा क्षेत्रात ५० मतदान केंद्रांवर करण्यात आला होता. आता त्यातही सुधारणा होऊन व्हीव्हीपॅटचा वापर गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाला आहे.
ईव्हीएमचा वापर करण्यापूर्वी मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जात होती. मतदाराला मतपत्रिका उपलब्ध करून दिली जात होती. या मतपत्रिकेवर उमेदवाराचे चिन्ह राहत होते. चिन्हासमोर शिक्का मारून मतदान करावे लागत होते. मतदान केलेली मतपत्रिका एका पेटीत टाकल्या जात होत्या. सदर पेट्या मोठ्या वाहनाच्या सहाय्याने मतमोजणी केंद्रांवर आणल्या जात होत्या. प्रत्येक मतपत्रिका उघडून मते मोजली जात होती. ही प्रक्रिया अतिशय किचकट, वेळखाऊ व कष्टप्रद होती.
निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने ईव्हीएमची कल्पना मांडली. त्यानंतर प्रायोगीक तत्त्वावर ही यंत्रे वापरण्याचा निर्णय घेतला.
१९८१ मध्ये केरळ राज्यातील उत्तर परवुर विधानसभा क्षेत्रात झालेल्या पोटनिवडणुकीत ५० मतदान केंद्रांवर ईव्हीएमचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. १९८२-८३ मध्ये विधानसभा मतदार संघामध्ये ईव्हीएमने मतदान घेण्यात आले. १९८४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करेपर्यंत ईव्हीएम मशीनचा वापर न करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर या यंत्राचा वापर स्थगित करण्यात आला. जानेवारी १९९९ मध्ये ईव्हीएमच्या वापराबाबत नेमलेल्या तज्ज्ञ समितीने अहवाल सादर केला. या अहवालात ईव्हीएमचा वापर करण्याची शिफारस केली. सन २००० नंतर प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमचा वापर सुरू झाला.
२०१३ मध्ये व्हीव्हीपॅटचा वापर
ईव्हीएमच्या विश्वसनियतेबाबत काही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ईव्हीएमच्या कार्यपद्धतीची विश्वसनियता आणखी वाढविण्यासाठी ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडण्यात आले आहे. ४ सप्टेंबर २०१३ रोजी नागालॅन्ड मधील नोकसेन विधानसभा मतदार संघात सर्वप्रथम व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात आला. एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही प्रत्येक ईव्हीएमला व्ही.व्ही.पॅट जोडण्यात आले होते.