महागाव आरोग्य केंद्र गट ‘ब’ च्या डॉक्टरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:56 IST2017-01-16T00:56:07+5:302017-01-16T00:56:07+5:30
येथून पाच किमी अंतरावार येत असलेल्या तसेच अहेरी व आलापल्ली या दोन मोठ्या शहरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या....

महागाव आरोग्य केंद्र गट ‘ब’ च्या डॉक्टरवर
सेवा कोलमडली : ६५ हजार लोकसंख्येचा भार
विवेक बेझलवार अहेरी
येथून पाच किमी अंतरावार येत असलेल्या तसेच अहेरी व आलापल्ली या दोन मोठ्या शहरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महागाव येथील आरोग्य केंद्राचा कारभार सध्या गट ‘ब’च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर चालविला जात आहे. या रूग्णालयात इतरही आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या रूग्णालयातील डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालयाची निर्मिती झाल्यानंतर अहेरी पासून पाच किमी अंतरावर असलेल्या महागाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अहेरी व आलापल्ली या दोन मोठ्या गावांचा समावेश होतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वेलगूर व देवलमरी ही दोन आरोग्य पथके येतात. महागाव, इंदाराम, व्यंकटरावपेठा अशी अन्य मोठी गावे या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोडतात. या सगळ्या गावांची लोकसंख्या ६५ हजारांच्या जवळपास आहे. महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गट ‘ब’ चा एकच वैद्यकीय अधिकारी आहे. डॉ. अल्का उईके यांच्याकडे सध्या प्रभार सोपविण्यात आला आहे. येथे गट ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील एक वर्षापासून रिक्त आहे. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे यांना सेवाअंतर्गत स्त्री रोग व प्रसुतीशास्त्राच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्यानंतर डॉ. राहूल राऊत यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा प्रभार सोपविण्यात आला. तेव्हापासून प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील एक एमबीबीएस डॉक्टर कमी झाला. यावरची डागडुजी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव अंतर्गत येणाऱ्या वट्रा येथील मानसेवी अधिकारी डॉ. अस्मिता गजाडीवार यांना पाठविण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र महागावची दयनिय अवस्था लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र देचलीपेठाचे गट ‘अ’ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. बिश्वास यांना प्रतीनियुक्तीवर पाठविले. डॉ. बिश्वास यांनी महागाव येथे सेवा दिलीच नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्र महागावमधील आरोग्य सहायीका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वर्ग चारची पदे रिक्त आहेत. काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर सेवा देत आहेत. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘मदर पीएचसी’चा दर्जा आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्त्व लक्षात घेता या केंद्राला गट अ चे वैद्यकीय अधिकारी देण्यात यावे, अशी मागणी आहे.
इतरही कामांमुळे त्रस्त
बाह्यरूग्ण विभाग, आंतररूग्ण विभाग, वित्ती व प्रशासकीय कार्य, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांना भेटी देणे पं.स. कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांच्या बैठकींनाही उपस्थित राहावे लागते. जिल्हास्तरावरच्या बैठकांना हजेरी लावणे, आश्रमशाळा तपासणी करणे, उपजिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया शिबिरास भेट देण्याचे काम डॉ. अल्का उईके यांनाच सांभाळावे लागते.