महाबीजचे अधिकारी पोहोचले शेतावर
By Admin | Updated: October 24, 2015 01:18 IST2015-10-24T01:18:18+5:302015-10-24T01:18:18+5:30
आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीमार्फत सुटीच्या दरात १०० क्विंटल धान्य पुरविण्यात आले होते.

महाबीजचे अधिकारी पोहोचले शेतावर
लोकमतच्या वृत्ताची दखल : पिकांची केली पाहणी
वैरागड : आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीमार्फत सुटीच्या दरात १०० क्विंटल धान्य पुरविण्यात आले होते. शेतकऱ्यांनी साबां मसुरी या वाणाचे पऱ्हे टाकून पेरणी केली. परंतु बियाणे निकृष्ट असल्याने धान रोवणीपासूनच रोग व विविध किडींचा प्रादुर्भाव झाला होता. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महाबीजचे अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी वैरागडातील शेतीच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली.
ज्या शेतकऱ्यांनी साबां मसुरी धान लागवड केली, त्या धानाची लोंबी अद्यापही भरली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी यासंदर्भात आरमोरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी एस. जी. गोथे व महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जी. एम. चिरूटकर, तालुका कृषी अधिकारी एल. ए. कटरे, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एस. एल. बोरकर, महाबीजचे क्षेत्र सहायक पी. एन. गावळे, कृषी मंडळ अधिकारी माधवर, कृषी पर्यवेक्षक वरोकर, कृषी सहायक दीपा क्षीरसागर, अनिल उके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वैरागडचे शेतकरी विश्वनाथ ठेंगरे, भास्कर बोडणे, रमेश बोडणे, रामचंद्र क्षिरसागर, गोरख भानारकर, प्रदीप बोडणे उपस्थित होते. खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. प्रारंभी अनेक शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय, पंचायत समितीमधून बियाण्यांची खरेदी सुटीवर केली.
अनेक शेतकऱ्यांनी खताची साठवणूक पूर्वीपासूनच केली होती. परंतु अनियमित पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. (वार्ताहर)