रोहयो कामाची काढली अल्प मजुरी
By Admin | Updated: January 11, 2016 01:23 IST2016-01-11T01:23:56+5:302016-01-11T01:23:56+5:30
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत घोट ग्रामपंचायती अंतर्गत नक्टू लोहबळे व परशुराम रटंकवार यांच्या शेतात बोडी खोलीकरणाची कामे करण्यात आली.

रोहयो कामाची काढली अल्प मजुरी
घोट : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत घोट ग्रामपंचायती अंतर्गत नक्टू लोहबळे व परशुराम रटंकवार यांच्या शेतात बोडी खोलीकरणाची कामे करण्यात आली. या दोन्ही कामावर अनुक्रमे ५४ व ५८ अशी एकूण ११२ मजूर कार्यरत होते. मात्र चामोर्शी पंचायत समितीचे तांत्रिक सहायक चलाख यांनी चुकीच्या पध्दतीने कामाचे मोजमाप केल्याने या कामावरील मजुरांची अल्प मजुरी काढण्यात आली असल्याचा आरोप रविवारी घोट येथे आयोजित पत्रकार परिषदेत करून उपस्थित मजुरांनी संबंधित तांत्रिक सहायकावर कारवाई करण्याची मागणी केली.
तांत्रिकांनी सहायकांनी रटकंवार यांच्या शेतातील बोडी खोलीकरण कामाचे ०.३० तर नक्टू लोहंबळे यांच्या शेतातील बोडी खोलीकरण कामाचे ०.१५ सेमी प्रमाणे मोजमाप केले, असे मजुरांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कायद्यानुसार रोहयो कामाची प्रती दिवस १८८ रूपये मजुरी आहे. मात्र सदर दोन्ही बोडी कामाचे चुकीच्या पध्दतीने मोजमाप झाल्याने या कामावरील मजुरांना प्रती दिवस केवळ १०० रूपये मजुरी मिळत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. पत्रकार परिषदेला गणेश गुरनुले, दिलीप मोहुर्ले, नितेश दुधबावरे, शंकर गावतुरे, गजानन मोहुर्ले, शामराव वसाके, भारत निकोडे, तुळशीराम वैरागडे उपस्थित होते. (वार्ताहर)