रेगडी प्रकल्पातून अत्यल्प सिंचन

By Admin | Updated: May 25, 2015 01:53 IST2015-05-25T01:53:09+5:302015-05-25T01:53:09+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली.

Low irrigation from Regdi project | रेगडी प्रकल्पातून अत्यल्प सिंचन

रेगडी प्रकल्पातून अत्यल्प सिंचन

गडचिरोली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यातूनच पाणीसाठा उपसा करून रेगडी गावातील १७० व विकासपल्ली गावातील १८० हेक्टर क्षेत्रास सिंचन करण्याच्या दृष्टीने रेगडी विकासपल्ली ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची असून मागील चार वर्षात केवळ ३० हेक्टर क्षेत्रावरच सिंचन या योजनेमुळे होऊ शकले. या योजनेचे अनेक किरकोळ काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेले आहे. राज्य सरकारचे ही योजना पूर्ण करण्याकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करीत आहे.
११ एप्रिल १९९० ला ६८.७३ लक्ष रूपये किमतीच्या रेगडी विकासपल्ली उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टर राहणार होती. सन २०१४-१५ पर्यंत पूर्वीचा शिल्लक धरून ७२.६७ लक्ष रूपयांचा निधी या योजनेकरिता मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाकरिता १४.९२० हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता असून जमीन संपादित करण्यात आली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. ६८.७३ लक्ष रूपये निधीच्या मूळ प्रस्तावास ११ एप्रिल १९९० ला मान्यता देण्यात आली. त्यावेळी प्रकल्पाची ठरवलेली ही किंमत १९८८-८९ च्या दरसूचीनुसार निश्चित करण्यात आलेली होती. त्यानंतर सुधारित मान्यतेसाठी व वाढीव निधीच्या रकमेसह प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १०५२.०० लक्ष रूपये होती.
आॅक्टोबर २०१४ अखेरपर्यंत ९३३.३६ लक्ष रूपये या उपसा सिंचन योजनेवर खर्च झाले. प्रकल्पाची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची आहे. मात्र योजनेचे शिर्षकामे पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर २००८ मध्ये चाचणी करण्यात आली. त्यानंतर सलग चार वर्षे सिंचन क्षमतेपेक्षा अत्यल्प सिंचन या उपसा सिंचन योजनेतून झालेले आहे. २०११-१२ मध्ये केवळ ३४ हेक्टर, २०१२-१३ मध्ये ३५ हेक्टर तर २०१३-१४ मध्ये केवळ दोन हेक्टर व २०१४-१५ मध्ये ३० हेक्टर सिंचन या योजनेतून झाले. सदर योजनेवर ९० अश्वशक्तीचे चार पंप आहे. पैकी दोनच पंप कार्यान्वित होते. दोनपंपाचे स्टॉर्टर बंद स्थितीत असल्याने व एका पंपाची वायरिंग जळालेली असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. योजनेची कामे पूर्ण झाले असून राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडे सुधारित प्रशासकीय मान्यता असल्याचे कळविले नसल्याने प्रकल्पाचे किरकोळ दुरूस्ती काम सध्या बंद झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Low irrigation from Regdi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.