मुतनूर यात्रेत लोटला जनसागर
By Admin | Updated: April 11, 2016 01:42 IST2016-04-11T01:42:36+5:302016-04-11T01:42:36+5:30
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ३७ किमी अंतरावरील अतिदुर्गम मुतनूर येथे आदिवासींच्या अम्बोजम्बो देवस्थानात गुढीपाडव्यानिमित्त ...

मुतनूर यात्रेत लोटला जनसागर
गुढीपाडव्याचे औचित्य : आदिवासींचे श्रद्धास्थान अम्बोजम्बो देवस्थानात घेतले दर्शन
तळोधी (मो.) चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ३७ किमी अंतरावरील अतिदुर्गम मुतनूर येथे आदिवासींच्या अम्बोजम्बो देवस्थानात गुढीपाडव्यानिमित्त भरलेल्या यात्रेत हजारो भाविकांची गर्दी उसळली. यात्रेत हजारो भाविकांनी दर्शन घेतले. देवस्थानात भाविकांची मांदियाळी होती.
गुढीपाडव्यानिमित्त मुतनूर पहाडीवर आयोजित यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची अधिक गर्दी उसळली होती. रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी पहाडीवर दाखल झाले. दरवर्षी यात्रास्थळी दुकाने लावली जात नव्हती. मात्र यंदा अनेकांनी दुकाने थाटली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री बाहेरील २० चमूंनी सांस्कृतिक व भक्तीगीतांचे कार्यक्रम सादर केले.
यात्रेत दाखल होणाऱ्या भाविकांसाठी मुतनूर ग्रामस्थांच्या वतीने ग्राम भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. (वार्ताहर)
२० वर्षांपासून यात्रेची परंपरा कायम
पावीमुरांडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निकोसे यांनी २० वर्षांपूर्वी मुतनूर पहाडीवर यात्रा भरविण्याची परंपरा सुरू केली. डॉ. निकोसे यांना साक्षात्कार झाला. त्यामुळेच यात्रेची परंपरा सुरू करण्यात आली, असा नागरिकांमध्ये समज आहे. विशेष म्हणजे मागील चार वर्षांपूर्वी यात्रेत भाविकांची फारसी गर्दी उसळत नव्हती. परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मुतनूर देवस्थानाला जिल्ह्यातील दुर्लक्षित देवस्थानाच्या यादीत समाविष्ट केल्याने ग्रामपंचायत पावीमुरांडाकडून ठराव घेऊन देवस्थान स्थळाचा विकास करण्याचे ठरविण्यात आले. त्वरित दोन टप्प्यात १५ लाख प्रमाणे ३० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तत्कालीन सरपंच रवींद्र कुळमेथे यांच्या कार्यकाळात पहिल्या टप्प्यात देवस्थानाच्या विकासासाठी प्रवेशद्वार, माता मंदिर बांधकाम, अर्ध्या अंतरावरील पायऱ्या तयार करण्यात आल्या. तसेच काही भाविकांनी पूर्वनियोजित जागेत आदिशक्ती, भगवान शंकर, दुर्गा मंदिर व मूर्तींची स्थापना स्व:खर्चातून केली. त्यामुळे मुतनूर देवस्थानाचा विकास होण्यास मदत होत आहे.