दहा लाखांचे नुकसान
By Admin | Updated: July 3, 2015 01:39 IST2015-07-03T01:39:57+5:302015-07-03T01:39:57+5:30
येथील तहसील कार्यालय मार्गावरील गजाजन कृषी केंद्राला गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुकानातील संपूर्ण शेतीविषय साहित्य जळून खाक झाले.

दहा लाखांचे नुकसान
घातपाताची चर्चा : कुरखेडात कृषी केंद्राला आग
कुरखेडा : येथील तहसील कार्यालय मार्गावरील गजाजन कृषी केंद्राला गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुकानातील संपूर्ण शेतीविषय साहित्य जळून खाक झाले. यामुळे दुकानमालकाचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भरत बनपूरकर यांचे तहसील कार्यालय मार्गावर गजानन कृषी केंद्र दुकान आहे. या दुकानातून ते बियाणे, कीटकनाशके, खते विकत होते. तसेच झेरॉक्स मशिन व संगणकही तेथे होते. गुरूवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. या आगीत दुकानातील धान, बिजाई खते, औषधी, संगणक, सीसीटीव्ही कॅमेरा, संपूर्ण फर्निचर, लाकडी दरवाजे, रेकार्डचे कागदपत्रे जळून खाक झाले.
घटनेची माहिती होताच राम लांजेवार, चांगदेव फाये, विलास गावंडे, रामहरी उगले, नागेश फाये, रवींद्र गोटफोडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन शेजारच्या फिरोज पठाण यांच्या ताज वॉशिंग सेंटरमधील मोटारपंपाच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. गुरूवारी दुकानाचे मालक भरत बनपूरकर यांनी कुरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. काही दिवसांपूर्वी बनपूरकर यांना चिठ्ठीद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याविषयीची तक्रारही त्यांनी पोलिस ठाण्यात केली होती. त्यामुळे दुकानाच्या जाळपोळीमागे कुणाचा तरी हात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, धमकीनंतर बनपूरकर यांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले होते. परंतु आगीत तेही जळाले. तलाठयांनी पंचनामा केला असून, पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)