छापील किमतीपेक्षा अधिकची लूटमार
By Admin | Updated: May 21, 2015 01:39 IST2015-05-21T01:39:16+5:302015-05-21T01:39:16+5:30
गडचिरोली जिल्ह्यात दुधाची टंचाई असल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून सहा हजार लिटर दूध आणले जाते.

छापील किमतीपेक्षा अधिकची लूटमार
दिगांबर जवादे गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात दुधाची टंचाई असल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून सहा हजार लिटर दूध आणले जाते. बाहेरून आणलेले पॉकेटबंद दूध ग्राहकाला विकतांना एका पुड्यामागे किमान दोन रूपये वितरक सहजतेने दररोज खिशात टाकत असल्याचे चित्र लोकमतने बुधवारी गडचिरोली शहरात केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरून उघडकीस आले आहे.
स्थानिक इंदिरा गांधी चौकात विविध वाहनातून हे दूध आणले जाते व येथे सकाळी मोठ्या प्रमाणावर वितरक दुधाची विक्री करतात. येथून चिल्लर विक्रेतेही सायकलवर ट्रे बांधून दुधाचे पुडे घेऊन विविध वॉर्डात रवाना होतात. बुधवारी सकाळी लोकमत प्रतिनिधीने इंदिरा गांधी चौकात आपले बस्थान मांडले व दुधाच्या पांढऱ्या धंद्यातला काळाबाजार अनुभवला. दुधाच्या अर्ध्या लिटरच्या पॅकेटावर १९ रूपये किंमत तर २०० एमएलच्या पॅकेटावर ८ रूपये किंमत असल्याचे दिसून आले. मात्र या दूध पॅकेटाची विक्री करताना सरळसरळ २० रूपये व १० रूपये घेतले जात होते. देणाराही कुणीही यावर आक्षेप घेताना दिसून आला नाही व विकणाराही राजरोसपणे ही रक्कम घेताना आढळून आला.
अनेकदा सकाळच्या सुमारास न खपलेले हे दूध अनेक विक्रेते आपल्या फ्रिजमध्ये दुकानात ठेवतात व दिवसभर त्याची विक्री करतात. त्याही वेळी फ्रिजचा कुलिंग चॉर्ज म्हणून ग्राहकांकडूनच तीन ते चार रूपये अधिकचे उकळले जाते. मूळत: अर्धा लिटरचे दूध पॉकेट या ठोक विक्रेत्यांना १५ रूपयाला मिळते. त्यावरही हे विक्रेते बराच नफा अतिरिक्त किंमत आकारून कमावित आहे. या दुधाच्या धंद्यावर सरकारच्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले.
तक्रार नाही म्हणून कारवाई नाही
कायद्यानुसार छापील किमतीपेक्षा अधिक दराने दुधच काय कोणत्याही वस्तूची विक्री करता येत नाही. तो गुन्हा ठरतो. छापील किमतीतच विक्री करणे आवश्यक आहे. दूध विक्रेते छापील किमतीपेक्षा जास्त किंमत आकारत असतील याची वैधमापनशास्त्र विभागाकडे याबाबतची तक्रार नागरिक, ग्राहक यांनी करावी, सदर विक्रेत्यावर कारवाई केली जाईल. मात्र बहुतांश नागरिक याबाबतची तक्रार करीत नाही. परिणामी कारवाई करतानाही अडचण येते. त्यामुळे ग्राहक जागृती होणे आवश्यक आहे.
- जी. एस. हगवणे, निरीक्षक, वैधमापन शास्त्र विभाग, गडचिरोली
पहाटे ४ ला दुधाची वाहने शहरात धडकतात
गडचिरोली जिल्ह्यात दुधाची कायम टंचाई राहत आली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील दूध परियोजनेला दूध पुरवठा करणाऱ्या जवळजवळ ६० ते ६५ सहकारी दूध संस्थांना टाळे लागले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात खासगी दूध कंपन्यांनी आपले हातपाय पसरविले आहे. काही खासगी दूध कंपन्यांसोबतच भंडारा जिल्ह्यातून एक सहकारी संस्थाही आपले दूध येथे पाठविते. दररोज पाच ते सहा हजार लिटर दूध नागपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यात गडचिरोलीत आणले जाते. एक लिटर, अर्धा लिटर व २०० मिलीचे दूध पॅकेट शहरात पहाटे ४ वाजतापासून येण्यास सुरुवात होतात.
दूध घरी पोहोचवितो म्हणून द्या जादा पैसे
सकाळी इंदिरा गांधी चौकातून दुधाचे ट्रे सोबत घेऊन गावात फिरून विकणारे दुध पॅकेट विक्रेते तर २० रूपयाचे पॅकेट २२ ते २३ रूपयाला व ८ रूपयाचे पॅकेट १२ रूपयाला विकतात. दुधाचे भाव वाढले आहे, घ्याल तर घ्या नाही तर जाऊ द्या, असे सरळठोक विक्रेते अनेक महिलांना सांगतानाही दिसून आले. त्यामुळे राजरोसपणे दूध विक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. तुमच्या घरापर्यंत आम्ही दुध घेऊन येतो. त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील, अशी मनमानी या दुधविक्रेत्यांची सुरू आहे.
काय म्हणतात दूध विक्रेत्यांचे प्रतिनिधी?
काही दुधाच्या कंपन्या दुधाच्या वाहतुकीचा खर्च देत नाही. तो खर्च एजन्सीधारकाला करावा लागतो. काही कंपन्या गडचिरोलीपर्यंतच दुधाचा पुरवठा करतात. चामोर्शी, अहेरी व इतर तालुक्यात मात्र स्वत:चे वाहन वापरून दूध उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे दुधाचा खर्च वाढून छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारल्याशिवाय पर्याय राहत नाही. दुधाचे पॅकेट लिकेज झाल्यास संपूर्ण पॅकेटचे दूध वाया जाते. पहाटे ४ वाजेपासून दिवसभर दूध विकावे लागते. परिणामी ते फ्रिजमध्ये ठेवावे लागते. त्याचाही खर्च एजन्सीधारकाला उचलावा लागतो. एवढेही करून दूध नासल्यास संपूर्ण पॅकेटचा खर्च एजन्सीधारकाला उचलावा लागतो. अर्ध्या लिटरच्या दुधाच्या पॅकेटवर १९ रूपये तर २०० एमएलच्या दुधाच्या पॅकेटवर ८ रूपये किंमत छापली आहे. मात्र बऱ्याचवेळा चिल्लरचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सरसकट १० व २० रूपये आकारले जातात. एवढे पैसे देण्यासाठी ग्राहकही नकार देत नाही. एक ते दोन रूपयांवर हा व्यवसाय करावा लागतो, अशी माहिती गडचिरोलीचे प्रमुख दुध विक्रेते मोहम्मद मुस्तफा शेख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मी दरदिवशी चौकात जाऊन अर्ध्या लिटरच्या दुधाचे पॅकेट खरेदी करतो. त्यावर १९ रूपये किंमत लिहिली राहते. मात्र कुलिंग चॉर्जेस म्हणून सर्वच दूध विक्रेते सरळ २० रूपये घेतात. एक रूपया परत मागण्यावरून एक - दोन वेळा दूध विक्रेत्यांसोबत वादही झाला आहे. बऱ्याच वेळा दूध विक्रेते १९ रूपये चिल्लर देण्याची मागणी करतात. त्यावेळी आपली अडचण होते. त्यामुळे सरळ २० रूपये दिले जातात. मात्र हे बेकायदेशीर असल्याने त्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
- सुनील चौधरी,
सर्वोदय वॉर्ड, गडचिरोली
अर्ध्या लिटरच्या दुधाच्या पॉकेटवर १९ रूपये किंमत लिहिली राहते. याबाबत आपण दूध विक्रेत्याला विचारले असता, घरी आणून देण्याचा खर्च म्हणून एक रूपया आगाऊ घेतला जातो, असे दूध विक्रेत्याकडून सांगण्यात आले. तेव्हापासून दूध विक्रेत्याला २० प्रमाणेच पैसे दिले जात आहेत. अडचण म्हणून दूध घ्यावे लागते. मात्र यामुळे ग्राहकांची लुबाडणूक होत असून त्यांच्यावर कारवाई करावी.
- अर्चना अविनाश कत्रोजवार, गांधी वॉर्ड, गडचिरोली