चौडमपल्ली शाळेचे रूप पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 01:27 IST2016-10-30T01:27:59+5:302016-10-30T01:27:59+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये होत असतानाच चामोर्शी

चौडमपल्ली शाळेचे रूप पालटले
गुणवत्ताही वाढली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळेत रंगरंगोटीसह सुविधा
आष्टी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये होत असतानाच चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली जि. प. शाळाही यात मागे राहिली नाही. तर या कार्यक्रमांतर्गत सर्व उपक्रमांची अंमलबजावणी शाळेत करण्यात आल्याने शाळेत रंगरंगोटी होऊन शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याने ये- जा करणाऱ्यांचे लक्ष शाळा वेधून घेत आहे.
चौडमपल्ली येथे १९६० मध्ये खासगी शाळा भरत होती. त्यावेळी इयत्ता पहिली ते सात वर्ग होते. दूरवरून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत होते. मात्र २००६ मध्ये ही शाळा बंद पडल्याने आजुबाजुच्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठिण ठरले. जिल्हा परिषद व ग्रामस्थांच्या पुढाकाराने २८ सप्टेंबर २००६ पासून येथे जि. प. शाळा सुरू झाली. सुरूवातीला इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत येथे वर्ग सुरू करण्यात आले. येथे ३२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यावेळी ही शाळा चौडमपल्ली येथील बालसदनात भरत होती. पुढे २००७ मध्ये चौथा वर्ग सुरू करण्यात आला. याच काळात २००७-०८ मध्ये येथे दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. २००६ ते २०१३ पर्यंत प्रदीप आकिनवार यांनी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्याच काळात शाळेचे बांधकाम करण्यात आले. २०१३ मध्ये मुख्याध्यापिका म्हणून तोटावार रूजू झाल्या. सध्या त्या या शाळेच्या कार्यभार सांभाळत आहेत. त्यानंतर २०१४ मध्ये पाचवा वर्ग सुरू करण्यात आला. सध्या येथे एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन शिक्षिका अध्यापनाचे कार्य करीत आहेत. शाळेच्या दोन्ही बाजुला षटकोनी वर्गखोल्या आहेत. शिवाय किचनशेड बांधण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यास आवारात खुली जागा आहे. त्यामुळे येथे शैक्षणिक वातावरण आहे व शाळा आदर्श शाळा म्हणून नावलौकिकास आली आहे. (प्रतिनिधी)
४ लाख ९५ हजारांतून संरक्षक भिंत
जि. प. च्या माध्यमातून प्राप्त झालेल्या ४ लाख ९५ हजार रूपयांच्या निधीतून संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले. त्याबरोबरच वर्गखोल्यातील भिंतींवर वर्णाक्षरे, दैैनंदिन परिपाठ, मराठी महिने, अन्नसाखळी, कोष्टके, लांबीची एकके, पक्ष्यांची ओळख, बेटी बचाओ, दातांची निगा, पर्यावरणाचे रक्षण आदीसंबंधी चित्रे रेखाटली आहे.