विकासासाठी पोलीस विभाग तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 03:08 IST2016-10-11T03:08:36+5:302016-10-11T03:08:36+5:30

नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग नेहमी तत्पर आहे.

Look forward to the Police Department for the development | विकासासाठी पोलीस विभाग तत्पर

विकासासाठी पोलीस विभाग तत्पर

गडचिरोली : नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग नेहमी तत्पर आहे. आजपर्यंत अनेक बाबींचा पाठपुरावा करण्यात आला आहे व यामाध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागाच्या विकासात भर पडली आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही पोलीस विभागाने पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने ९ उपविभागीयस्तरावर जनमैत्री मेळावा तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याच धर्तीवर गडचिरोली उपविभागीय कार्यालयाच्या वतीने ९ ते ११ आॅक्टोबर यादरम्यान जनमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला उपस्थित असलेल्या नागरिकांना सोमवारी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख बोलत होते.
यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, समाजसेवक देवाजी तोफा, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील जनता व पोलीस यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावे, याउद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. तीन दिवसीय मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, शेतीविषयक समस्या, महसूलविषयक माहिती, पेसा कायदा व ग्रामसभेच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मेळाव्याला शेकडो नागरिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना समाजसेवक देवाजी तोफा यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाचा विकास करण्याचे आवाहन केले. संचालन पीएसआय सतीश शिरसाट तर आभार पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Look forward to the Police Department for the development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.