मद्यसम्राटांची जिल्ह्याच्या सीमेवर नजर
By Admin | Updated: March 16, 2015 01:13 IST2015-03-16T01:13:53+5:302015-03-16T01:13:53+5:30
लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १ एप्रिलपासून दारूबंदी करण्याची घोषणा शासनाने केली. याबाबत गृह विभागाने १० मार्चला शासन परिपत्रक निर्गमित केले.

मद्यसम्राटांची जिल्ह्याच्या सीमेवर नजर
देसाईगंज : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १ एप्रिलपासून दारूबंदी करण्याची घोषणा शासनाने केली. याबाबत गृह विभागाने १० मार्चला शासन परिपत्रक निर्गमित केले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यसम्राटांच्या नजरा आता गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात भंडारा, गोंदिया जिल्ह्यावर खिळल्या आहेत. आतापासूनच मद्यसम्राटांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जागेचा व गावाचा शोध घेणे सुरू केले असून जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या हालचाली वाढल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे देसाईगंज तालुक्याला लागून असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूचा महापूर वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होणार असल्याचे परिपत्रक गृह विभागाने निर्गमित केले. या परिपत्रकातून चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यसम्राटांना त्यांचे दारूदुकान कायद्याने दारूबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा सोडून राज्यात इतरत्र कुठेही प्रचलित नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून सुरू ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असा दिलासाही दिला आहे. गडचिरोली जिल्ह्याची सीमा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर, सोनी (चपराड) व गोंदिया जिल्ह्यातील अरूणनगर, महागाव, सिरोली, मांडोखाल व अर्जुनी-मोरगाव या गावाला लागून आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील काही मद्यसम्राटांनी वणी शहराकडे दारू दुकाने थाटण्याच्या हालचाली वाढविल्या आहेत. मात्र वणी शहरात दारू दुकानांची गर्दी वाढून जमिनी कमी पडत आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील काही मद्यसम्राटांनी आपले दारू दुकान लावण्यासाठी आता गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा भागात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात हालचाली वाढविल्या आहेत.
चंद्रपुरातील मद्यसम्राटांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे प्रथम अर्ज करावे लागणार आहे. त्यात त्यांची अनुज्ञपी कोणत्या जिल्ह्यात सुरू करणार याबाबत त्यांना उल्लेख करावा लागणार आहे. हे अर्ज आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर त्यांना ते आपल्या अभिप्रायासह अंतिम आदेशासाठी शासनाकडे पाठवावे लागणार आहे. वर्धा, गडचिरोली व त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होत असल्याने मद्यसम्राट गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. इतर जिल्हे मद्यसम्राटांना दूर पडतात. त्यामुळे मद्यसम्राट गोंदिया व भंडारा जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविणार असल्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)