खेड्यातील रौनक मावळली
By Admin | Updated: February 5, 2016 01:06 IST2016-02-05T01:06:56+5:302016-02-05T01:06:56+5:30
सर्वाेच्च न्यायालयाने शंकर पटावर बंदी घातल्यामुळे पूर्व विदर्भातील ग्रामीण भागातील अर्थकारणावरही मोठा परिणाम झाला असून ...

खेड्यातील रौनक मावळली
शंकरपट बंदीचा परिणाम : १५० वर्षे जुने पट बंदच; शौकिनांत निरुत्साह
कुरखेडा : सर्वाेच्च न्यायालयाने शंकर पटावर बंदी घातल्यामुळे पूर्व विदर्भातील ग्रामीण भागातील अर्थकारणावरही मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागात शंकरपटाच्या निमित्ताने पाहावयास मिळणारा उत्साह आता पर्णत: मावळला आहे.
मागील दोन वर्षांपासून न्यायालयाने शंकर पटावर बंदी घातली आहे. त्यामुळे शंकरपटासाठी तयार करण्यात येणारे बैल आता नांगर व बंडीला जुंपावे लागत आहे. यावर्षाच्या सुरूवातीला केंद्र सरकारने शंकर पटाला मंजुरी प्रदान केली होती. त्यामुळे पट शौकिनांमधला उत्साह दुणावला होता. परंतु ‘पेटा’ ही संघटना पुन्हा न्यायालयात गेल्याने न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातली आहे. पूर्वी पटासाठी खास बैल तयार केले जात होते. खरिपाचा धान निघाल्यावर शेतकरी शंकर पटाच्या आयोजनासाठी लागायचे. या पटाकरिता बैलांना तयार केल्यावर त्यांचे नामकरणही करण्यात येत होते. झाडीपट्टीत पटासाठी तयार होणाऱ्या बैलांना वाघ्या, चेंडू, झेंडू, मिरची, ससा, माळी, हरण्या, सरण्या, शेर, डुकऱ्या अशी नावेही दिली जायची. अनेक पट शौकिनांच्या तोंडी ही नावे घर करून असायची. शंकर पटात वापरला जाणार छकडा पटाच्या हंगामापूर्वी दुरूस्त केला जायचा. ऐरवी घराच्या आडोश्याला अडकवून ठेवलेला छकडा पटाच्या निमित्ताने काढून त्याची चाके दुरूस्त केली जायची. जिल्ह्यात विशेषत: मकरसंक्रांतीनंतर पटाच्या हंगामाला सुरूवात होत असल्याने अनेक ठिकाणच्या नावाजलेल्या पटांमध्ये जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातीलही पट शौकीन बैलजोड्यांसह दाखल व्हायचे. कुरखेडा तालुक्यातील कोलारी, मासळ, मोजी किन्ही, साकोली, निलागोंदी आदी गावांमध्ये १५० वर्षांपासून शंकरपट भरविला जात होता. पटामध्ये जिंकणाऱ्या जोडीला बक्षीस मिळत होते. परंतु आता शंकर पटांवर न्यायालयाने बंदी घातल्याने पट शौकिनांच्या आनंदावर विरजन पडले आहे. (शहर प्रतिनिधी)