पेठवासीयांनी ठोकले गावातील पानठेल्याला कुलूप

By Admin | Updated: January 15, 2017 01:35 IST2017-01-15T01:35:06+5:302017-01-15T01:35:06+5:30

चामोर्शी तालुक्याच्या घोट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पेठ येथील सर्व लोकांनी मिळून मकर संक्रांतीच्या पर्वावर दारू व इतर सर्व व्यसनावर निर्बंध लावला.

Locked by the villagers in Paltheya village | पेठवासीयांनी ठोकले गावातील पानठेल्याला कुलूप

पेठवासीयांनी ठोकले गावातील पानठेल्याला कुलूप

तंबाखुमुक्तीसाठी पुढाकार : पुरूष, युवक व महिला एकवटले
घोट : चामोर्शी तालुक्याच्या घोट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पेठ येथील सर्व लोकांनी मिळून मकर संक्रांतीच्या पर्वावर दारू व इतर सर्व व्यसनावर निर्बंध लावला. या गावात गेल्या २० वर्षांपासून दारूला पूर्णत: हद्दपार करण्यात आले. आता महिलांनी व पुरूषांनी मिळून शनिवारी गावातील पानठेल्यांवर कुलूप ठोकले. यातून पेठवासीयांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
पेठ गावात खर्रा व तंबाखू सेवनाचे प्रमाण लहान मुलापासून वयोवृध्दापर्यंत सर्वांमध्ये वाढले होते. येथील व्यसन पूर्णत: बंद झाले पाहिजे, असा विचार गावातील लोकांमध्ये आला. त्यानंतर १४ जानेवारी रोजी शुक्रवारला चामोर्शी येथील मुक्तीपथच्या तालुका कार्यालयात मुक्तीपथचे तालुका संघटक संदीप वखरे, प्रेरक विनायक कुनघाडकर यांनी गावात जाऊन व्यसनाचे दुष्परिणाम नागरिकांना सांगितले. त्यानंतर गावातील महिला, पुरूष व युवकांनी एकत्र येऊन पेठ हे गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला. दरम्यान ग्रामस्थांनी मिळून गावात सुरू असलेल्या पानठेल्याला कुलूप ठोकून पानठेले बंद केले.
याप्रसंगी गावात व्यसनमुक्त संघटना गठीत करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष विलास वनकर, उपाध्यक्ष परशुराम रंटकवार, सचिव अविनाश चंदनखेडे, सहसचिव मंगला रंटकवार, कोषाध्यक्ष मनिषा रंटकवार यांच्यासह सदस्य प्रविण वाकडे, किशोर रंटकवार, सावळाराम खोब्रागडे, दिवाकर बुद्दलवार, खुशाल रंटकवार, प्रकाश रंटकवार, वनिता रंटकवार आदीसह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

खर्रा खाणाऱ्यावर ५०० रूपये दंड
पेठ येथे दारू व तंबाखुमुक्तीबाबत स्थानिकांकडून जनजागृती सुरू आहे. लोकांनी व्यसन सोडावे, असे आवाहन आहे. कोणत्याही व्यक्तीने दारू प्राशन केले अथवा खर्रा खाला असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर ५०० रूपये दंड आकारण्याचा निर्णय व्यसनमुक्त संघटना व गावाने सामुहिकरित्या घेतला आहे.

Web Title: Locked by the villagers in Paltheya village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.