रामकृष्णपूर शाळेला ठोकले कुलूप
By Admin | Updated: January 13, 2015 22:58 IST2015-01-13T22:58:59+5:302015-01-13T22:58:59+5:30
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रामकृष्णपूर शाळेतील शिक्षक हलदर यांची पंचायत समिती शिक्षण विभागाने अन्य शाळेत बदली केली. आधिच शिक्षकांची कमतरता असताना

रामकृष्णपूर शाळेला ठोकले कुलूप
शिक्षकाची बदली रद्द करा : कालीमाता मंदिराच्या प्रांगणात भरविली जात आहे शाळा
आष्टी : चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रामकृष्णपूर शाळेतील शिक्षक हलदर यांची पंचायत समिती शिक्षण विभागाने अन्य शाळेत बदली केली. आधिच शिक्षकांची कमतरता असताना योग्य सेवा देणाऱ्या शिक्षकांची बदली केल्याच्या कारणावरून सदर स्थानांतरण रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी पालकांनी रामकृष्णपूर जि. प. शाळेला कुलूप ठोकले. सध्या ही शाळा कालीमाता मंदिराच्या समोरील परिसरात भरविण्यात येत आहे.
रामकृष्णपूर येथील पालकाच्या शिष्टमंडळाने चामोर्शीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे रामकृष्णपूर शाळेचे शिक्षक हलदर यांची बदली केल्यास शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. शिक्षक हलदर यांचे स्थानांतरण दोन दिवसात रद्द करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी त्यावेळी केली होती. त्यानंतर ५ जानेवारीला पं. स. सभापती व उपसभापती यांनाही निवेदन देऊन शिक्षक हलदर यांची बदली इतर शाळेत करू नये, अशी मागणी लावून धरली. त्यावेळी पं. स. पदाधिकाऱ्यांकडून बदली रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पं. स. शिक्षण विभागाने याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त पालकांनी चक्क शाळेला कुलूप ठोकले व आपला रोष व्यक्त केला. शिक्षक हलदर यांची बदली रद्द होईपर्यंत शाळेचा कुलूप उघडणार नाही, असा इशाराही पालकांनी प्रशासनाला दिला आहे. परिणामी गावातील वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)