पहिल्याच दिवशी चार शाळांना कुलूप
By Admin | Updated: June 27, 2015 01:52 IST2015-06-27T01:52:34+5:302015-06-27T01:52:34+5:30
राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुका ठिकाणचे मॉडेल स्कूल यावर्षी बंद केल्याच्या निषेधार्थ ...

पहिल्याच दिवशी चार शाळांना कुलूप
वेगवेगळ्या समस्या : तातडीने उपाययोजना करण्याची पालकांची मागणी
गडचिरोली : राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुका ठिकाणचे मॉडेल स्कूल यावर्षी बंद केल्याच्या निषेधार्थ धानोरा तालुक्यातील नागरिक संतप्त झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी मोहलीच्या नागरिकांनी मोहली येथील जिल्हा परिषद हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चक्क कुलूप लावून बंद ठेवली. तसेच शिक्षकांच्या मागणीसाठी चामोर्शी तालुक्यातील निकतवाडा शाळेला नागरिकांनी कुलूप ठोकले. तसेच विविध शैक्षणिक मागण्यांसाठी शुक्रवारी आरमोरी तालुक्यातील सायगाव जि. प. शाळा नागरिकांनी बंद ठेवली.
२०११-१२ पासून राज्यात मॉडेल स्कूल ही केंद्रपुरस्कृत योजना राबविली जात होती. केंद्र शासनाने २०१५-१६ पासून ही योजना बंद केली. त्यामुळे जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड अशा पाच मॉडेल स्कूल बंद केल्या आहे व या मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. मॉडेल स्कूल बंद केल्याच्या निषेधार्थ बुधवारी नागरिकांनी मोहली येथील जि.प. शाळेसमोर आंदोलन केले. तसेच शाळा बंद ठेवली. मोहली येथील बाजारपेठही बंद होती. दरम्यान आ. डॉ. देवराव होळी व माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
निकतवाडा शाळा बंद
चामोर्शी पं.स. अंतर्गत निकतवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. आर. गणवीर यांची पोतेपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेत तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली होती. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी गणवीर यांना निकतवाडा शाळेवर परत पाठविण्यात आलेले नाही. गणवीर यांना १५ जूनपर्यंत परत पाठविण्याकरिता गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. तरीही त्यांची तात्पुरती बदली रद्द झालेली नाही. सध्या निकतवाड्याच्या शाळेत केवळ एकच शिक्षिका कार्यरत आहे. यावर्षी शाळेमध्ये ७२ विद्यार्थी असून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. एक शिक्षक एवढ्या वर्गांना शिकवू शकत नाही. मुख्याध्यापक गणवीर यांची बदली रद्द न करण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.
कारमपल्ली शाळा बंद
शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक न आल्याने एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली येथील जिल्हा परिषद शाळा उघडण्यात आली नाही. ही शाळा द्विशिक्षकी आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थी शाळेबाहेर थांबले होते. यावेळी पं.स. माजी उपसभापती व विद्यमान सदस्य केशव पुडो व प्रतिष्ठीत नागरिक घिस्सा गावडे उपस्थित होते. या दोघांनी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
सायगावलाही कुलूप
आरमोरी तालुक्यातील सायगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भाजप पदाधिकारी व नागरिकांनी कुलूप ठोकले. ही शाळा सहा शिक्षकी असून ९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक व दोन शिक्षिका निष्क्रीय असल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा ढासळला असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला होता. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीने त्यांना मौखिक समज दिली होती. तरीही त्यांच्या सुधारणा न झाल्यामुळे त्यांची बदली करण्याचा ठराव सायगाव ग्रामपंचायतने १७ जानेवारी २०१५ ला ग्रामसभेत पारित केला. त्यानंतर ही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.
अरसोडावासीयांचा शाळेवर बहिष्कार
जिल्ह्यातील ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, या मागणीसाठी आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेवर पालक व विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला. शुक्रवारी या शाळेत एकही विद्यार्थी उपस्थित झाले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क )
कसनसूर व हालेवाराला लवकरच सुटी
कसनसूर व हालेवारा येथील शासकीय आश्रमशाळा सकाळी सुरू झाल्यानंतर केवळ तासभरात विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. कसनसूर येथील शाळा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत असून १९० विद्यार्थिनी व १३४ विद्यार्थी शाळेत आहेत. त्यापैकी ६२ विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित होते. ही आश्रमशाळा असल्याने २२९ विद्यार्थी निवासी आहेत. परंतु त्यापैकी कुणीही शाळेला आलेले नव्हते. हालेवारा येथील २४९ पैकी केवळ २२ विद्यार्थी उपस्थित होते. कसनसूर व हालेवारा शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे लवकर सुटी देण्यात आल्याचे सांगितले. एटापल्ली टोला, मवेली, आलेंगा, झुरी, लांजी, कसनसूर, हालेवारा या जिल्हा परिषद शाळांमध्ये सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.