एटापल्ली ग्रामीण रूग्णालयाला ठोकले कुलूप

By Admin | Updated: September 23, 2015 05:17 IST2015-09-23T05:17:00+5:302015-09-23T05:17:00+5:30

मागील दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने एटापल्ली ग्रामीण

Locked down atopapalli rural hospital | एटापल्ली ग्रामीण रूग्णालयाला ठोकले कुलूप

एटापल्ली ग्रामीण रूग्णालयाला ठोकले कुलूप

एटापल्ली : मागील दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने एटापल्ली ग्रामीण रूग्णालयाची आरोग्यसेवा ढासळली आहे. या मुद्यावर संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ग्रामीण रूग्णालयाला कुलूप ठोकले. यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ निर्माण झाली.
या आंदोलनाचे नेतृत्त्व एटापल्लीचे पं. स. सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके, महेश पुल्लूरवार, सचिन मुतकुरवार, संदीप सेलवटकर, नरेंद्र गाईन, मयूर नामेवार, जनार्धन नल्लावार, संदीप जोशी आदींनी केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तालुक्यातील दुर्गम भागातून आलेल्या रूग्णांना या रूग्णालयात चांगली आरोग्यसेवा मिळत नाही. अनेकदा या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने अनेक रूग्णांना या रूग्णालयात आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याच्या मागणीबाबतचे निवेदन १४ सप्टेंबर रोजी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. २१ सप्टेंबरपर्यंत या रूग्णालयातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची मागणी करण्यात आली होती. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला होता. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने मंगळवारी आठवडी बाजाराच्या दिवशी संतप्त नागरिकांनी रूग्णालयाला कुलूप ठोकले.
आठवडी बाजार असल्यामुळे मंगळवारी तालुकाभरातून शेकडो रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात आले होते. शेकडोंचा जमाव पाहून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, ठाणेदार सुहास आव्हाड हे रूग्णालयस्थळी पोहोचले. रूग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून नागरिक दूर गेल्यानंतर या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालयाचे कुलूप उघडले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. दरम्यान गडचिरोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. ग्रामीण रूग्णालयाच्या समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन डॉ. खंडाते यांनी यावेळी दिले. त्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रमेश गंपावार, मनोहर हिचामी, नसरू शेख, राकेश समुद्रलवार आदींसह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कुलूप ठोकून प्रश्न निकाली काढणे हे उचित नाही. सदर प्रकरणाची चौकशी करून एटापल्ली ग्रामीण रूग्णालयाचे जे वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले आहेत. ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदांसंदर्भात पदभरती घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.
- रणजीतकुमार, जिल्हाधिकारी, गडचिरोली

Web Title: Locked down atopapalli rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.