बीएसएनएल आॅफिसला ठोकले कुलूप
By Admin | Updated: May 20, 2015 02:01 IST2015-05-20T02:01:07+5:302015-05-20T02:01:07+5:30
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या भोंगळ कारभाराला कंटाळून अखेर आरमोरीतील संतप्त नागरिकांनी मंगळवारी येथील बीएसएनएल कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले.

बीएसएनएल आॅफिसला ठोकले कुलूप
आरमोरी : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या भोंगळ कारभाराला कंटाळून अखेर आरमोरीतील संतप्त नागरिकांनी मंगळवारी येथील बीएसएनएल कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले. बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता नान्हे यांना लेखी निवेदन देऊन तत्काळ सेवा पूर्ववत सुरळीत करण्याची मागणी केली.
वारंवार खंडीत होणाऱ्या बीएसएनएलच्या सेवेमुळे शहरातील व तालुक्यातील भ्रमणध्वनीधारक कमालीचे त्रस्त झाले होते. या संदर्भात अनेकदा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मंगळवारी बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या विरोधात ग्राहकांचा असंतोष रस्त्यावर आला. त्यामुळे बीएसएनएलचे कार्यालय गाठून संतप्त नागरिकांनी कुलूप ठोकले.
या आंदोलनादरम्यान ग्राहकांनी कनिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी बीएसएन सेवा लवकर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात भारत बावणथडे, पंकज खरवडे, राजू कंकटवार, सुशील पोरेड्डीवार, महेंद्र शेंडे, अंकूश खरवडे, नंदू नाकतोडे, सूरज हेमके, गणेश बैरवार, प्रफुल ठवकर, चंदू आकरे, सचिन बेहरे, स्वप्नील धात्रक, गोलू वाघरे, युगल सामृतवार, सचिन बेहरे, नितीन जोथ, दीपक हेडाऊ आदी उपस्थित होते.
थ्रीजी, ब्रॉडबँड सेवा सुधारा
आरमोरीतील बीएसएनएल कार्यालय प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीएसएनएलच्या थ्रीजी सेवेचा वेग अतिशय कमी झाला आहे. ब्रॉडबँड सेवाही ठप्प झाली आहे. याचा फटका विद्यार्थी व्यावसायिक, नोकरदार, शासकीय कार्यालय, बँका आदीसह समाज व्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे बीएसएनची सेवा पूर्ववत सुरळीत करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.