भामरागड रूग्णालयाला कुलूप ठोकणार
By Admin | Updated: April 25, 2017 00:33 IST2017-04-25T00:33:20+5:302017-04-25T00:33:20+5:30
ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एल. जामी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल श्रुंगारे गायब झाले आहेत.

भामरागड रूग्णालयाला कुलूप ठोकणार
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : वैद्यकीय अधीक्षक गायब
भामरागड : ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एल. जामी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल श्रुंगारे गायब झाले आहेत. त्यामुळे भामरागड रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीच राहिलेला नाही. २४ तासाच्या आत भामरागड ग्रामीण रूग्णालयाला वैद्यकीय अधिकारी न मिळाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य अॅड. लालसू नरोटे यांच्या नेतृत्वात भामरागड तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, भामरागड ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल श्रुंगारे आहेत. पण त्यांची प्रतिनियुक्ती एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात करण्यात आली आहे. ते भामरागड येथे काम करताना आरोग्य सेवेकडे लक्षच देत नाही. सतत गैरहजर राहतात व अत्यंत बेजबाबदार आहे. त्यांची येथे परत नियुक्ती करू नये, बिनागुंंडाच्या धबधब्यावर डॉ. जामी यांचा मृत्यू झाला. त्यावेळी श्रुंगारे व पाच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते भामरागड मधून पसार झाले आहेत. व त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाच्या मदतीने बदली करून घेतली. ही संपूर्ण घटनाच संशयास्पद आहे. जामींची हत्याच करण्यात आली, अशी दाट शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन देताना जि.प. सदस्य अॅड. लालसू नरोटे यांच्यासह सपना रामटेके चिन्ना महाका, राजेंद्र कोठारे, गोविंद चक्रवती, अक्रम पठाण, गोई कोडापे, बेबी पोरतेट आदी उपस्थित होते. या निवेदनात जामी यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करावी व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ग्रामीण रूग्णालय भामरागड येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावे, सर्व मानसेवी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, बिनागुंडा, गोंगवाडा, मिरगुळवंचा, कोठी, ताडगाव येथे मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे आदींसह मागण्यांचा समावेश आहे.