पलसगड ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:36 IST2017-09-13T00:36:21+5:302017-09-13T00:36:21+5:30
सरपंचाने तेंदूपत्ता ठेकेदाराकडून परस्पर १ लाख ९० हजार रुपये घेऊन त्यास स्वस्त दरात कंत्राट दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन सरपंचावर कारवाई करावी, ....

पलसगड ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : सरपंचाने तेंदूपत्ता ठेकेदाराकडून परस्पर १ लाख ९० हजार रुपये घेऊन त्यास स्वस्त दरात कंत्राट दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन सरपंचावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शेकडो नागरिकांनी पलसगड गटग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले.
स्वातंत्र्यदिनी पलसगड गटग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दादाजी कसारे, ईश्वर मेश्राम व रवींद्र पुराम यांनी तेंदूपत्ता कंत्राटदाराकडून सरपंच उमाजी धुर्वे यांनी १ लाख ९० हजार रुपये परस्पर घेऊन स्वस्त दरात कंत्राट देऊन भ्रष्टाचार केला व त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असा आरोप केला होता. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी थेट ग्रामसभेतूनच विश्वनाथ तुलावी यांच्या मोबाईलचे स्पिकर आॅन करून तेंदूपत्ता कंपनीचे मॅनेजर पारधी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सरपंच धुर्वे यांना रक्कम दिल्याचे कबूल केले व गरज पडल्यास कोणत्याही कोर्टात कबुली देण्यास तयार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामसभेने सरपंचास विचारणा केली असता सरपंच उमाजी धुर्वे यांनी रक्कम घेतल्याची कबुली दिली. मात्र ग्रामसभेकडून रकमेची मागणी होताच सरपंच धुर्वे हे ग्रामसदस्याना दमदाटी करू लागले. यामुळे सरपंच उमाजी धुर्वे यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन गावकºयांनी संबंधित अधिकाºयांना दिले होते. परंतु कारवाई न झाल्याने ग्रामवासीयांनी पलसगड गटग्रामपंचायतीस टाळे ठोकले. याप्रसंगी पलसगड गटग्रामपंचायतींतर्गत गावांतील सुमारे तिनशे नागरिक उपस्थित होते. याबाबतची माहिती मिळताच बीडीओ मरसकोल्हे पलसगड येथे पोहचले. त्यांनी संतप्त गावकºयांशी चर्चा केली. त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुलूप उघडण्यात आले.