पुलखलवासीयांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
By Admin | Updated: October 4, 2015 02:09 IST2015-10-04T02:09:02+5:302015-10-04T02:09:02+5:30
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धेसंदर्भात ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती.

पुलखलवासीयांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
ग्रामसभेला खो : ग्रामसेवकावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी; मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली
गडचिरोली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धेसंदर्भात ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. मात्र संबंधित ग्रामसेवक या संदर्भात पदाधिकाऱ्यांना कुठलीही माहिती न देता ग्रा.पं. कार्यालयातून देवदर्शनासाठी बाहेरगावी रवाना झाले. यावर संतप्त झालेले ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले.
राज्याचे ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व ग्रामपंचायती महिला व ग्रामस्वच्छतेवर ग्रामसभा घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार पुलखल ग्रामपंचायतीमध्ये १ आॅक्टोबर रोजी गुरूवारला पहिला ग्रामसभा व २ आॅक्टोबर रोजी सर्वसाधारण ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसेवक जी. एम. पिंपळे हे हजर न झाल्याने ग्रामसभा पार पडली नाही. या संदर्भात सरपंच व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन ग्रामसेवक पिंपळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पुलखल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जी. एम. पिंपळे हे ग्रामसभेची नोटीस काढताच ग्रा.पं. कार्यालयातून देवदर्शनाला निघून गेले. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत तसेच सरपंचाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना वा पत्र दिले नाही. ग्रामसभा न झाल्यामुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेपासून वंचित राहावे लागले, असेही सरपंचांनी निवेदन म्हटले आहे. ग्रामविकास मंत्र्यांच्या आदेशाची तसेच कायद्याची पायमल्ली करणाऱ्या ग्रामसेवक पिंपळे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास गावकरी रस्त्यावर उतरून जि.प. प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही सरपंच व ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. या संदर्भात ग्रामसेवक जी. एम. पिंपळे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन माहिती देतो, असे सांगितले. परंतु ते कार्यालयात आले नाही. (प्रतिनिधी)