राजाराम-पेरमिली गणात स्थानिक उमेदवार मैदानात राहणार
By Admin | Updated: January 19, 2017 02:08 IST2017-01-19T02:08:22+5:302017-01-19T02:08:22+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अहेरी तालुक्यात असलेल्या राजाराम-पेरमिली

राजाराम-पेरमिली गणात स्थानिक उमेदवार मैदानात राहणार
पं. स. मध्ये पुरूषांना संधी : गेल्यावेळचे आरक्षण यंदाही कायमच
भास्कर तलांडे राजाराम
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अहेरी तालुक्यात असलेल्या राजाराम-पेरमिली जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्राचे नाव यावेळी बदलविण्यात आले आहे. गतवेळी हे क्षेत्र पेरमिली-राजाराम या नावाने होते.
हे जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. राजाराम व पेरमिली हे दोन्ही पंचायत समिती गण अनुसूचित जमाती (पुरूष) प्रवर्गासाठी राखीव आहेत. मागील निवडणुकीतही हा क्षेत्र अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होता. येथून नाग विदर्भ आंदोलन समितीच्या तिकीटावर जिल्हा परिषदेत राणी रूख्मीनीदेवी सत्यावनराव आत्राम निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत भाजप (नाविस) कडून पल्ले येथील रहिवासी असलेले माजी पं. स. उपसभापती बोड्डाजी गावडे यांची कन्या मनीषा बोड्डाजी गावडे यांच्यासाठी उमेदवारीची मागणी रेटून धरण्यात आली आहे. तर विद्यमान पं. स. सभापती रविना गावडे यासुद्धा येथूनच निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत.
काँग्रेस पक्षाकडून येरमनारचे सरपंच तथा काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बालाजी गावडे यांच्या पत्नी लैला गावडे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची हवा सध्या मतदार संघात पसरली आहे. आदिवासी विद्यार्थी संघाकडूनही दोन नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. यामध्ये राजाराम ग्रामपंचायतीचे सरपंच ज्योती जुमनाके व पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम यांचे नातलग मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. सध्या तरी या क्षेत्रात उमेदवार निश्चित झाले नसले तरी स्थानिक उमेदवारच रिंगणात राहतील, असे चित्र आहे.
विशेष म्हणजे या मतदार संघात भाजप (नाविस), आदिवासी विद्यार्थी संघ व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती आदिवासी विद्यार्थी संघाच्या वर्चस्वाखाली आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना नाविसचा हा गड भाजपसाठी कायम राखण्याकरिता मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
८ ग्रामपंचायत व २० गावांचे क्षेत्र
राजाराम-पेरमिली या जिल्हा परिषद मतदार संघात ८ ग्रामपंचायत समाविष्ट असून २० गावे या क्षेत्रात येतात. यामध्ये राजाराम, खांदला, पेरमिली, कुरूमपल्ली, मेडपल्ली, येरमनार, आरेंदा, पल्ले, गोलाकर्जी, रायगट्टा, मरनेली, चिरेपल्ली, कोत्तागुडम, पत्तीगाव, कोरेपल्ली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर क्षेत्र विस्ताराने प्रचंड मोठे असून दुर्गम गावे अनेक आहेत. दळणवळणाची साधने सुद्धा या भागात नाही. त्यामुळे चारचाकी वाहने या गावांपर्यंत जाणे अत्यंत कठीण बाब आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.