मुलचेरा तालुक्यात स्थानिक उमेदवारांनाच मिळाली संधी
By Admin | Updated: February 27, 2017 01:21 IST2017-02-27T01:21:44+5:302017-02-27T01:21:44+5:30
मुलचेरा तालुक्याच्या जि.प. क्षेत्रात पहिल्यांदाच जागांची वाढ झाली. जिल्हा परिषदेचे तीन, पंचायत

मुलचेरा तालुक्यात स्थानिक उमेदवारांनाच मिळाली संधी
आजी माजी जि.प. अध्यक्षांना धक्का : पराभव पत्करावा लागला
मुलचेरा/गोमणी : मुलचेरा तालुक्याच्या जि.प. क्षेत्रात पहिल्यांदाच जागांची वाढ झाली. जिल्हा परिषदेचे तीन, पंचायत समितीच्या सहा गणांच्या जागांसाठी निवडणूक नुकतीच आटोपली. दोन जि.प. क्षेत्र खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होती. त्यामुळे प्रथमच तालुक्यातील बंगाली बांधवांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली. सदर निवडणुकीत स्थानिक उमेदवारांनाच मतदारांनी संधी दिली असून आजी व माजी जि.प. अध्यक्षांना घरचा रस्ता दाखविला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जि.प. च्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार विरूध्द राजकीय पक्षाचे दिग्गज उमेदवार अशी थेट लढत होती आणि तशीच लढतही झाली. मात्र मतदारांनी स्थानिक उमेदवारांनाच पसंती दर्शविली, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील कालिनगर, विवेकानंदपूर क्षेत्रातून भाजपतर्फे माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुका अध्यक्ष युध्दिष्ठीर बिश्वास यांनी निवडणूक लढविली. तर स्थानिक उमेदवार म्हणून बादलशहा हे अपक्षरित्या मैदानात होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून शिशिर बाला यांनी निवडणूक लढविली. मात्र सदर निवडणुकीत या क्षेत्रात काँग्रेसला यश मिळविता आले नाही. स्थानिक उमेदवारांच्या मतांची विभागणी होऊन भाजपचे उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र येथे तसे काही घडले नाही. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युध्दिष्ठीर दुखीराम बिश्वास यांचा ४९२ मतांनी विजय झाला.
सुंदरनगर-गोमणी जि.प. क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्यमान जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी निवडणूक लढविली. या क्षेत्रात काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष रवींद्र शहा तर भाजपाकडून संतोष सरदार मैदानात होते. मागील जि.प. निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यात सरदार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. मात्र यापूर्वीच्या जि.प. सदस्यांनी या क्षेत्रात फिरकून पाहिले नाही. त्यामुळे याचा थेट फायदा काँग्रेसचे स्थानिक उमेदवार रवींद्रशहा यांना झाला. येथे दोन स्थानिक उमेदवारांच्या मताची विभागणी होऊन राकाँचे उमेदवार विजयी होणार, अशी शक्यता होती. मात्र तसे न होता. काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत झाली व यात काँग्रेसच्या उमेदवारांचा ५५७ मतांनी विजय झाला. सुंदरनगर-गोमणी क्षेत्रातून काँग्रेसचे रवींद्रनाथ निर्मल शहा हे विजयी झाले.
कोठारी-शांतीग्राम जि.प. क्षेत्रातून राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कनिष्ठ कन्या तनुश्री आत्राम निवडणुकीच्या मैदानात होत्या. भाजपातर्फे स्थानिक उमेदवार म्हणून माधुरी संतोष उरेते तर आदिवासी विद्यार्थी संघातून मंगला संजू आत्राम, रासपकडून पल्लवी जानकीराम कुसनाके मैदानात होत्या. या क्षेत्रात चार उमेदवार रिंगणात होते. येथे मताची विभागनी होऊन राकाँच्या उमेदवार तनुश्री आत्राम विजयी होतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र या क्षेत्रात भाजप व राकाँच्या उमेदवारांमध्ये थेट लढत झाली व यात भाजपच्या उरेते या ३१४ मतांनी विजयी झाल्या.
मुलचेरा तालुक्यात यंदा प्रथमच निवडणुकीत क्रास मतदान करण्यात आले नाही. भाजपा, राष्ट्रवादी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांनी आपापले उमेदवार उभे करून स्वतंत्ररित्या लढले. विशेष म्हणजे, यावेळी तालुक्यातील उमेदवारांनी बाहेरच्या उमेदवारांना पसंती दर्शविली नाही. स्थानिक उमेदवारांचा मुद्दा लोकांमध्ये सातत्याने चर्चेत राहिला. त्यामुळेच मुलचेरा तालुक्यातील तिन्ही जि.प. क्षेत्रात वेगवेगळ्या पक्षाचे स्थानिक उमेदवार विजयी झाले. कालिनगर-विवेकानंदपूर व सुंदरनगर-गोमणी या दोन्ही जि.प. क्षेत्रात बंगाली समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. विवेकानंदपूर व सुंदरनगर या दोन ग्रामपंचायती तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती आहेत. सदर दोन्ही ठिकाणी तालुकाध्यक्ष वास्तव्याने असतात. विवेकानंदपूर ग्रामपंचायत भाजपचा गड मानला जातो. मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला १ हजार २०४ पैकी केवळ ३०१ मते या निवडणुकीत मिळाली. सुंदरनगर गावात एकूण ९४८ पैकी १२५ मते राकाँच्या उमेदवाराला मिळाली. त्यामुळे या क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार शहा विजयी झाले. सदर निवडणुकीत आजी, माजी जि.प. अध्यक्षांना पराभव पत्करावा लागला.