लॉयड मेटल कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत

By Admin | Updated: April 29, 2016 01:30 IST2016-04-29T01:30:43+5:302016-04-29T01:30:43+5:30

तब्बल १२-१४ वर्षानंतर लॉयड मेटल या कंपनीकडून एटापल्ली तालुक्यात सुरजागड परिसरात मागील महिन्यापासून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू करण्यात आले होते.

Lloyd Metal Company is preparing to rollback | लॉयड मेटल कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत

लॉयड मेटल कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत

उत्खननाचे काम थांबविले : मजुरांची पोलीस ठाण्याकडे विचारपूस
गडचिरोली : तब्बल १२-१४ वर्षानंतर लॉयड मेटल या कंपनीकडून एटापल्ली तालुक्यात सुरजागड परिसरात मागील महिन्यापासून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू करण्यात आले होते. येथून लोहखनिजाची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र याला अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी प्रचंड विरोध केल्याने लॉयड मेटल कंपनीने येथून उत्खननाचे काम थांबवून गाशा गुंडाळण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे.

२००६ मध्ये लॉयड मेटलसह जवळजवळ १० कंपन्यांना तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने सुरजागड पहाडीवर लोहखनिजाची लीज दिली होती. त्यात लॉयड मेटल कंपनीला साडेतीनशे हेक्टरवर लीज देण्यात आली होती. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे मागील दहा-बारा वर्ष अनेकदा प्रयत्न करूनही येथे उत्खननाचे काम सुरू करता आले नव्हते. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक घेतल्यानंतर यावर्षी येथे लॉयड मेटलने कामाला सुरूवात केली होती. या कामावर ३५० स्थानिक मजुरांना काम देण्यात आले होते. यामध्ये एटापल्ली तालुक्याच्या बांडे, परसलगोंदी, मलमपाडी, एटापल्ली, हेडरी, आलदंडी, पुसलगोंदी, येमली, तुमरगुडा, सुरजागड, मांगेर येथील ३०० ते ३५० मजूर ३४० रूपये रोजीच्या हिशोबाने ठेवण्यात आले होते. या मजुराकरवी लॉयड मेटलने दोन लाख रूपयांच्या रॉयल्टीचे उत्खनन केले. शासनाकडे मात्र २३ लाख रूपयांचा भरणा रॉयल्टीच्या रूपाने करण्यात आला आहे. येथून दिवसाला २० ट्रक माल नेला जात होता. प्रत्येक ट्रकवर तीन कामगारही कार्यरत होते. मात्र येथून उत्खनन करून वाहतूक करू नये यासाठी स्थानिक संघटना व राजकीय नेत्यांनी जोरदार आंदोलने केलीत व काम बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लॉयड मेटलने येथून उत्खननाचे काम बंद करून आपला गाशा गुंडाळण्याची तयारी केली, असे समजते. जे मजूर या कामावर जात होते. त्यांना काम बंद झाले आहे, असे सांगून देण्यात आले. ते कधी सुरू होईल, याची कल्पना त्यांना देण्यात आली नाही. मंगळवारी व बुधवारी काही मजूर हेडरी पोलीस ठाण्यात काम कधी सुरू होईल, हे विचारणा करण्यासाठी गेले होते, असे कळते. मात्र तिथूनही मजुरांना काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे हे मजूर काम सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कंपनीचे ट्रकही अडविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कंपनीने येथून काम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कंपनी गडचिरोली जिल्ह्यात आष्टी परिसरात उद्योग टाकण्यासाठी जागाही शोधत होती. कोनसरी परिसरात कंपनीने जागेकरिता शोधकामही सुरू केले होते, अशी माहिती आहे. असे असताना उत्खननाचे काम बंद झाल्याने आता या साऱ्या बाबीला धक्का बसण्याची शक्यता आहे. तब्बल बारा वर्षानंतर सुरू झालेले हे काम राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने व जिल्हा विकासावर राजकीय पक्षांमध्ये एकमत प्रवाह नसल्याने बंद होऊन येथून कंपनी आपला गाशा गुंडाळण्याची शक्यता आहे. विदर्भात वर्धा व घुग्गुस येथे या कंपनीचे प्रकल्प सध्या सुरू आहे. यासह आणखी काही कंपन्या येथे उत्खनन सुरू करण्यासाठी येईल, अशी आशा असताना आता लॉयड मेटलने काम बंद केल्याने आता पुन्हा हा प्रकल्प बारगळण्याची शक्यता दिसत आहे. कंपनीच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडे याबाबत भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता, कुणाचाही संपर्क झाला नाही. त्यामुळे कंपनीची बाजू जाणून घेता आली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Lloyd Metal Company is preparing to rollback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.