शेतकऱ्यांना जनावर न देताच पशुधन अधिकाऱ्याने हडपले पैसे
By Admin | Updated: June 22, 2016 00:46 IST2016-06-22T00:46:32+5:302016-06-22T00:46:32+5:30
आरमोरी पंचायत समितींतर्गत येणाऱ्या देशपूर गावच्या सात शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून वर्ष २०१५-१६ मध्ये दोन गाई व दोन म्हशी,

शेतकऱ्यांना जनावर न देताच पशुधन अधिकाऱ्याने हडपले पैसे
गडचिरोली : आरमोरी पंचायत समितींतर्गत येणाऱ्या देशपूर गावच्या सात शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून वर्ष २०१५-१६ मध्ये दोन गाई व दोन म्हशी, १० शेळ्या देण्याची योजना होती. या योजनेतून जनावर न देता या लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे आरमोरी पंचायत समितीचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. भदाने यांनी हडप केल्याचा गंभीर आरोप सात शेतकऱ्यांनी गडचिरोली येथे मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात आपल्याला तत्काळ न्याय देण्यात यावा, अन्यथा आपण तीव्र आंदोलन करू, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांनी दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तथा नवबौध्द प्रवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी वर्ष २०१५-१६ मध्ये शासनामार्फत पंचायत समितीस्तरावर विशेष घटक योजना राबविण्यात आली. या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला दोन गायी किंवा दोन म्हशी व १० शेळ्या देण्यात येणार होत्या. दोन गाई किंवा दोन म्हशींची किंमत ८४ हजार तर १० शेळ्यांची किंमत ४८ हजार रूपये अशी होती. लाभार्थी हिस्सा शेळ्यांसाठी १२ हजार ५०० रूपये गाई व म्हशीसाठी २२ हजार रूपये घेण्यात आले. देशपूर येथील गार्इंचे चार तर शेळ्यांचे तीन लाभार्थी या योजनेसाठी मिळाले. त्यानंतर पंचायत समितीचे प्रभारी पशुधन अधिकारी डॉ. भदाने यांच्याकडे शेतकऱ्यांनी संपर्क साधला. तेव्हा डॉ. भदाने यांनी तुम्ही आपल्या परिसरातील जनावर खरेदी करा, नागपूर भागातील जनावर गडचिरोलीच्या वातावरणा सूट होणार नाही, असा सल्ला दिला व शेतकऱ्यांकडील अॅडव्हॉन्स रक्कम आपल्याकडे ठेवून घेतली. त्यानंतर भदाने यांनी ही रक्कम गहाळ केली व सरळ कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर यांच्याकडून जनावर खरेदी केल्याच्या पावत्याच आणून दिल्या. लाभार्थ्यांच्या सह्या व आंगठे ते घेऊन गेले. एक महिन्यानंतर आम्हाला आरमोरीच्या बाजारात प्रत्येकी २०० रूपये देऊन बिल्ले लावलेल्या जनावरासोबत आमचा फोटो काढून घेतला. ती जनावरे घरी आणली. मात्र पशुधन विकास अधिकाऱ्यांनी जनावर ेविक्रेत्यांच्या मालकाला पैसे दिले नाही म्हणून सर्वच जनावरे घेऊन गेले. आमची शुध्द फसवणूक झाली आहे. या प्रकरणी प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. भदाने हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी ऋषी तानू सिडाम, चंद्रभान तुळशीराम सिडाम, तुकाराम बाजीराव तुमराम, परशुराम तुकाराम सहारे, चंद्रभान सदाशिव उंदीरवाडे, अरूण सदाशिव उंदीरवाडे, निलेश देविदास ंउंदीरवाडे या शेतकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.
या संदर्भात आरमोरी पं.स.चे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. भदाने यांना विचारणा केली असता, या शेतकऱ्यांना जनावरे दिली आहेत. त्यांनी ती विकली असावीत, असे ते म्हणाले. (नगर प्रतिनिधी)