पशुधन विमा पंधरवडा होणार साजरा
By Admin | Updated: July 30, 2016 02:04 IST2016-07-30T02:04:06+5:302016-07-30T02:04:06+5:30
जनावरांचा विमा उतरविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १ ते १५ आॅगस्ट या कालावधीत पशुधन विमा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे.

पशुधन विमा पंधरवडा होणार साजरा
पशुसंवर्धन विभाग : १ ते १५ आॅगस्ट दरम्यान कार्यक्रम
गडचिरोली : जनावरांचा विमा उतरविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १ ते १५ आॅगस्ट या कालावधीत पशुधन विमा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देशी, संकरीत गायी, म्हशी, पाळीव पशु, घोडे, गाढव, वळू, बैल व रेडे आणि शेळया मेंढया यांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरीता जास्तीत जास्त प्रती लाभार्थी प्रती कुटुंब पाच जनावरांचा समावेश आहे. विमा रक्कम ही जनावराच्या प्रत्यक्ष किमतीवर आधारीत असते. जनावरांची किंमत ही वय, स्वास्थ्य व दुध उत्पादनावर पशुपालक, पशुवैद्यकीय अधिकारी व विमा प्रतिनिधी यांच्या मार्फत निश्चित करण्यात येते. शेळ्या, मेंढ्या, डुकरे व ससे यांना लाभ द्यावयाचा झाल्यास अनुदान देय ठरविण्यासाठी एक पशुधन घटक यावर आधारीत अनुदानाचा लाभ निश्चित करण्यात आला आहे. एक पशुधन घटक म्हणजे १० शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे आदी असे समजण्यात येते. पाच पशुधन घटकाप्रमाणे ५० शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे यांचा लाभ देण्यात येतो. पाच पेक्षा कमी शेळया, मेंढया, डुकरे, ससे असलेल्या लाभार्र्थीना पशुधन घटक समजून या योजनेचा लाभ देण्यात येईल. अधिक माहिती करीता जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)