सेंद्रिय शेतीने पिकांना जीवदान
By Admin | Updated: December 14, 2015 01:43 IST2015-12-14T01:43:49+5:302015-12-14T01:43:49+5:30
कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही,....

सेंद्रिय शेतीने पिकांना जीवदान
कडधान्य पिके जोमात : ढगाळ वातावरणाच्या कचाट्यातूनही बचावले
वैरागड : कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी कडधान्य पिकाची पेरणी सेंद्रिय खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी केल्याने ढगाळ वातावरणाच्या कचाट्यात सापडूनही पिकांना जीवनदान मिळाले आहे.
जिल्ह्यात तूर पिकासह उडीद, मूग, पोपट, वाटाणा, चना, मसूर, भूईमूग आदी कडधान्य व तैलवर्गीय पिके घेतली जातात. यंदा सदर पिकांची नदी, नाले, ओढ्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व पिकासाठी पाण्याची व्यवस्था आहे. अशा ठिकाणीही शेतकऱ्यांनी कडधान्याची पेरणी केली आहे. मागील पंधरवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या पिकांवर वातावरणाचा परिणाम होईल की काय, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे. परंतु रबी हंगामातील पिकांची पेरणी करताना शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक बहरत आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम पिकांवर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)