दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील ७१ इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारती पाडण्याबाबत नगर परिषदने नोटीस बजावली आहे. मात्र, सदर इमारती यावर्षीही पाडण्याची शक्यता कमी आहे. कुटुंब वास्तव्यास असलेली इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धोकादायक इमारती कोसळण्याच्या सततच्या दुर्घटनांमुळे ही समस्या अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. इमारतींच्या आयुर्मानाचा विचार करता, त्यांची दुरुस्ती, पुनर्बाधणी असे सारे पैलू महत्त्वाचे ठरतात. परंतु अनेकविध कारणांनी त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे इमारती कमकुवत होतात. नागरिक वास्तव्यास असलेल्या इमारती कोसळून नागरिकांचा बळी गेले आहेत. १७ प्रभाग गडचिरोली शहरात आहेत. नवीन वस्त्या वगळता प्रत्येक प्रभागात दोन ते तीन तसेच त्याहून अधिक जीर्ण इमारती आहेत. अनेक नागरिक स्वतःहून इमारतीचे निर्लेखन करीत नाही
नगर परिषदेच्या नोटीसला जुमानतो तरी कोण?इमारत पाडण्याबाबत नगर परिषद दरवर्षीच नोटीस बजावते. मात्र, कोणतीही कारवाई करीत नाही, याची पक्की शाश्वती इमारत मालकाला असल्याने मालक इमारत पाडत नाही. अशा इमारती अतिशय धोकादायक असतात. या इमारती वेळी पाडणे आवश्यक आहे.
इमारत निर्लेखित करण्यात नेमकी काय अडचण ?इमारती जीर्ण असूनही त्या पाडल्या जात नाहीत. यामध्ये बऱ्याच वेळा न्यायालयाचा मुद्दा असतो. प्रकरण न्यायालयात सुरू असते. जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही, तोपर्यंत धोकादायक इमारती कायम राहतात. बऱ्याचवेळा अशा ठिकाणी दुकान किंवा इतर व्यवसाय असते.
१३ इमारती पाडल्यामागील वर्षी एकूण ८४ इमारती धोकादायक होत्या. त्यापैकी १३ इमारती नागरिकांनी पाडल्या आहेत. आता ७१ इमारती शिल्लक आहेत. सदर इमारती पाडण्यात याव्या याबाबतची नोटीस नगर परिषदेने दरवर्षीप्रमाणे बजावली आहे. अशा इमारती कोसळण्याचा सर्वाधिक धोका पावसाळ्यात असतो. त्यामुळेच प्रशासन याच कालावधीत अलर्ट होत असते. यानंतर पुन्हा दुर्लक्ष होते.