वसतिगृहाची यादी जाहीर
By Admin | Updated: October 1, 2014 23:23 IST2014-10-01T23:23:28+5:302014-10-01T23:23:28+5:30
शाळा महाविद्यालय सुरू होऊनही तीन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. याबाबत सम्यक विद्यार्थी

वसतिगृहाची यादी जाहीर
गडचिरोली : शाळा महाविद्यालय सुरू होऊनही तीन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. याबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ आॅक्टोबर रोजी निदर्शने केली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. पुणे येथील समाजकल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काही तासांच्या आतच सुमारे १४७ विद्यार्थ्यांची यादी घोषित केली आहे. हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे फार मोठे यश आहे.
मागास वर्गीय विद्यार्थ्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी प्रत्येक जिल्हास्थळी व काही तालुकास्थळी वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांवर विशेष समाजकल्याण विभागाचे नियंत्रण राहते. वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होईल या अनुषंगाने अनेक गरीब विद्यार्थ्यांनी शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. मात्र यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्याला अक्षम्य दुर्लक्ष झाले. चालू शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरीही वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती नसतांनाही किरायाच्या खोलीमध्ये राहावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. काही विद्यार्थ्यांनी तर शाळा महाविद्यालयांमध्ये येणेच बंद केले होते. यादी तत्काळ जाहिर करण्यात यावी, यासाठी समाज कल्याण विभागाला अनेकवेळा विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. गडचिरोली येथील विशेष समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधला व सांयकाळ होण्यापूर्वीच वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सुमारे १४७ विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय लवकरच होणार आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक व आर्थिक नुकसान वाचणार आहे. या आंदोलनात संदीप रहाटे, प्रमोद माहोरकर, जितेंद्र वंजारे, अमोल खोब्रागडे, राजू दामले, व्यंकटेश भक्तू, सागर रोकडे, विकेश मडावी, देवेंद्र मेश्राम, प्रितम मेश्राम, राकेश निष्ठुरी, दिलीप नंदेश्वर, महेश निष्ठुरी, पंकज गेडाम, पंकज राऊत, कुणाल दरडे, राकेश तलमले आदी सहभागी झाले होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे विद्यार्थी व पालकांनी कौतूक केले आहे. विशेष म्हणजे जे काम मागील तीन महिन्यांपासून रखडले होते, सदर काम आंदोलनानंतर काही तासांतच पूर्ण झाले आहे. हे आंदोलनकर्त्यांचे फार मोठे यश आहे. (नगर प्रतिनिधी)