हलक्या धानपिकाचे नुकसान

By Admin | Updated: October 26, 2014 22:40 IST2014-10-26T22:40:34+5:302014-10-26T22:40:34+5:30

जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची पेरणी शेतात केली आहे. परंतु मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हलके धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत.

Lightweight damages | हलक्या धानपिकाचे नुकसान

हलक्या धानपिकाचे नुकसान

गडचिरोली : जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची पेरणी शेतात केली आहे. परंतु मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हलके धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत. अनेक ठिकाणच्या हलक्या धानपिकाची स्थिती अतिशय दुरवस्थेत आहे. त्यामुळे हाती आलेले धानपीक नष्ट होईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कोरवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात तळीबोडी ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी शेतकरी जड धानपीक घेतात. परंतु ज्या भागात पाण्याच्या स्त्रोतांचा अभाव आहे, अशा ठिकाणी शेतकरी १५ ते २५ दिवस लवकर उत्पन्न निघेल, अशा धानपिकाची पेरणी करतात. जिल्ह्यात हलक्या धानपिकाच्या परेणीचे क्षेत्र जवळपास २५ टक्के आहे. सध्य:स्थितीत हलके धानपीक कापणीला आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी करून बांधणीही केली आहे. तर मध्यमप्रतीचे धानपीक सध्य:स्थितीत अनेक शेतात उभे आहे. त्यामुळे मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका या धानपिकाला बसत आहे. आरमोरी तालुक्यातील शिवणी बुज, वासाळा, डोंगरगाव, ठाणेगाव, चामोर्शी माल, वणखी त्याबरोबरच वैरागड परिसरातीलही करपडा, लोहारा, सिर्सी, गणेशपूर परिसरातील हलके धानपीक कापून बांधणी करण्यात आले आहे.
गडचिरोली तालुक्यातील दिभना, जेप्रा, राजगाटा, आंबेशिवणी, उसेगाव, भिकारमौशी, अमिर्झा, चांभार्डा, टेंभा, मरेगाव, मौशीखांब परिसरातील हलके धानपीक येत्या आठ दिवसात कापणीच्या तयारीत होते. परंतु दोन दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानाची कापणी थांबली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या धानाच्या कडपाही भिजल्या आहेत. त्याबरोबरच मध्यप्रतीचे धानपीक वादळवारा व पावसामुळे पूर्णत: जमिनीला टेकले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका या धानाला बसणार आहे. ज्या धानपीकाची कापणी करून कडपा वाळविण्यासाठी ठेवल्या आहेत, अशा धानपिकाला पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच पावसामुळे धानाला भावही कमी मिळू शकतो, अशी शक्यता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lightweight damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.