भूमकानला विजेची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:38 IST2018-03-19T00:38:05+5:302018-03-19T00:38:05+5:30
जिल्ह्यातील एका अतिदुर्गम गावाला प्रकाशमान करण्याचे प्रयत्न महावितरण कंपनीने केले खरे; परंतु या गावात प्रकाश पडला नाही.

भूमकानला विजेची हुलकावणी
ऑनलाईन लोकमत
एटापल्ली : जिल्ह्यातील एका अतिदुर्गम गावाला प्रकाशमान करण्याचे प्रयत्न महावितरण कंपनीने केले खरे; परंतु या गावात प्रकाश पडला नाही. एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या भूमकान गावाला मागील २८ वर्षात विजेने दोनदा हुलकावणी दिली. या गावातील नागरिक अद्यापही विजेपासून वंचित आहेत.
एटापल्ली तालुक्यातील भूमकान हे गाव अतिदुर्गम आहे. छत्तीसगडची सीमा अवघ्या दीड किलोमीटरवर आहे. शासकीय कामाशिवाय या व परिसरातील गावातील नागरिकांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क फारसा येत नाही. बाजारहाट आणि अन्य दैनंदिन व्यवहारही बव्हंशी छत्तीसगडशीच होतो. मानेवारा गटग्रामपंचायतींतर्गत मानेवारा, भूमकान, गुडरम व तारका या गावांचा समावेश होतो. भूमकान गावात ७५ घरे असून, लोकसंख्या ५५० एवढी आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर या गावात वीज पोहोचलीच नाही. त्यामुळे कंदिल आणि दिव्याच्या प्रकाशातच परिसरातील नागरिकांनी स्वातंत्र्यानंतरची ७० वर्षे काढली.
१९९० नंतर आता पुन्हा नव्या महावितरण कंपनीला जाग आली. या कंपनीने मागच्या वर्षी एप्रिल २०१७ मध्ये भूमकानमध्ये नवीन ट्रान्सफार्मर लावले, सिमेंटचे खांब उभे केले आणि ताराही लावल्या. सदर काम होऊन वर्ष पूर्ण होत आहे. परंतु गावात सरकारचा उजेड पडला नाही. वीज केव्हा सुरु करणार, अशी विचारणा करणारे पत्र ग्रामपंचायतीने दिवाळीपूर्वी कसनसूरच्या महावितरण कार्यालयाला दिले. त्याचे उत्तर अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये शासन प्रशासनाविषयी चीड आहे.
१९९० मध्ये पहिल्यांदा उभे झाले ट्रान्सफॉर्मर
१९९० मध्ये तेव्हाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या डोक्यात उजेड पडला होता. मंडळाने त्या वर्षी भूमकान गावात ट्रान्सफॉर्मर लावले, खांब उभे केले आणि ताराही ताणल्या होत्या. मात्र, गावात उजेड पडला नाही. बरीच वर्षे लोक वाटच पाहत राहिले. पण, गाव प्रकाशमान झाले नाही. अखेर ट्रान्सफार्मर जिथल्या तिथे गंजले, काही खांब वाकले, काही तुटले आणि तारांची चोरी झाली. त्यानंतर पुन्हा प्रयत्न झाले नाही. तब्बल २८ वर्षानंतर महावितरण कंपनीने वीज खांब उभे केले. परंतु प्रकाश पोहोचला नाही.