बहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:46 IST2018-09-16T00:45:59+5:302018-09-16T00:46:20+5:30
डोक्यावर भाल्याने वार करून बहिणीची हत्या करणाऱ्या आरोपीस भावास गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी दिला.

बहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : डोक्यावर भाल्याने वार करून बहिणीची हत्या करणाऱ्या आरोपीस भावास गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी दिला.
रमेश व्यंकटी जनगाम रा. नडीकुड्डा तालुका सिरोंचा असे आरोपीचे नाव आहे. तर बालका समय्या बोरमपल्ली असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतकाचा पती समय्या बोरमपल्ली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १ आॅगस्ट २०१५ रोजी सकाळी तो त्याची पत्नी मृतक समय्य बोरमपल्ली व गावातील मजूर, महाकाली कावेरी हिच्यासोबत शेतात काम करण्यासाठी गेले होते. समय्या हा डवरणीचे काम करीत होता. दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान रमेश व्यंकटी जनगाम व बापू व्यंकटी जनगाम शेतात आले. रमेश जनगाम याने बालकाच्या डोक्यात लोखंडी धारदार भाला मारला. बालका ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याने भाला मारला असल्याचे प्रत्यक्षदर्शी महाकाली कावेरी हिने बघितले. याप्रकरणी ३ आॅगस्ट रोजी रमेशला अटक करण्यात आली. बापू व्यंकटी जनगाम हा फरार आहे. दोन्ही बाजुचे साक्ष पुरावे तपासल्यानंतर रमेश जनगाम याला भादंवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक हजार रूपयाचा दंड सुनावला.
सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास आसरअल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सचिन पवार यांनी केला. सहायक पोलीस निरिक्षक शरद मेश्राम यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.