हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
By Admin | Updated: April 14, 2016 01:32 IST2016-04-14T01:32:26+5:302016-04-14T01:32:26+5:30
अतिक्रमित शेतीच्या वादातून मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा येथील रहिवासी अर्जुन मुत्यालू कुसनाके ...

हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
गडचिरोली : अतिक्रमित शेतीच्या वादातून मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा येथील रहिवासी अर्जुन मुत्यालू कुसनाके (६५) याला शेतशिवार परिसरात दगडाने ठेचून ठार मारणाऱ्या आरोपीस गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत एस. शिंदे यांनी बुधवारी या प्रकरणातील सर्व साक्षी पुरावे तपासून तसेच दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून जन्मठेप व एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
विकास विद्यापती सेडमाके (२२) रा. अहेरी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अर्जुन मुत्यालू कुसनाके, तुकाराम कुसनाके, जानू कुसनाके व देवाजी कुसनाके हे चार भाऊ आपल्या कुटुंबासह तुमरगुंडात स्वतंत्र राहत होते. जानू कुसनाके हा पोलीस पाटील आहे तर अर्जुन कुसनाके हा चुटुगुंटा ग्रामपंचायतीचा सदस्य होता. अहेरी येथील विकास सेडमाके हा त्याचा नातेवाईक अमित सेडमाके यांच्या घरी तुमरगुंडा येथे राहण्यास आला होता. अमित सेडमाके याने शेतीवर अतिक्रमण केले होते. सदर जमीन अमित सेडमाके याच्या नावावर करण्याबाबतचा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता व सदर वाद गावातील वयस्कर ग्रा.पं. सदस्य असलेल्या अर्जुन कुसनाके यांच्याकडे आला. दरम्यान गावात झालेल्या बैठकीत अर्जुन कुसनाके याने सदर वादावर तोडगा काढून अतिक्रमीत जमीन अमित सेडमाके याच्या नावावर करून दिली नाही. या कारणावरून विकास सेडमाके याच्या मनात राग होता. दरम्यान ६ जानेवारी २०१२ रोजी आरोपी विकास सेडमाके याने अर्जुन कुसनाके याला शांतीग्राम-तुमरगुंडा रोडवरील शांतीग्राम शेतशिवारालगतच्या कक्ष क्रमांक २९९ च्या जंगलात नेऊन त्याला दगडाने ठेचून ठार मारले. या संदर्भाची तक्रार मृतक अर्जुन कुसनाके याचा भाऊ पोलीस पाटील, जानू कुसनाके याने अहेरी पोलीस ठाण्यात केली. अहेरी पोलिसांनी आरोपी विकास सेडमाके याच्या विरोधात भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस निरिक्षक वैष्णवी पाटील यांनी सदर प्रकरण न्यायालयात वर्ग केले. या प्रकरणी साक्षीपुरावे तपासून न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आरोपी विकास सेडमाके याला जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.