पत्नीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: June 16, 2016 01:57 IST2016-06-16T01:57:06+5:302016-06-16T01:57:06+5:30
पत्नी कोणत्याही प्रकारचा कामधंदा करीत नाही, या कारणावरून भांडण करून तिला दगडाने मारून व अंगावर रॉकेल टाकून पत्नीला जाळून ठार करणाऱ्या

पत्नीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
न्यायालयाचा निर्णय : २०१५ मध्ये रॉकेल टाकून पत्नीला जाळले
गडचिरोली : पत्नी कोणत्याही प्रकारचा कामधंदा करीत नाही, या कारणावरून भांडण करून तिला दगडाने मारून व अंगावर रॉकेल टाकून पत्नीला जाळून ठार करणाऱ्या आरोपी पतीस गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
सोनू लुला आतला (३५) रा. कर्काझोरा ता. गडचिरोली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. कर्काझोरा येथील दौलू गोसाई कोवाची यांची मुलगी श्यामलता हिचे सोनू लुला आतला याच्याशी सन २००४ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर सोनू आतला हा घरजावई म्हणून कर्काझोरा येथे राहत होता. पती सोनू आतला हा पत्नी श्यामलता हिच्याशी शुल्लक कारणावरून अनेकदा भांडण करून तिला मारझोड करायचा. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी पती सोनू आतला याने पत्नी श्यामलता हिच्याशी वाद घालून तिला मारझोड केली. तसेच दगडाने तिच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून टाकले. यात श्यामलता ही गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेची तक्रार मृतक मुलगी श्यामलता हिचे वडील दौलू कोवाची यांनी पोटेगाव पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी पती सोनू आतला याचेवर भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोटेगावचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नितीन कामे यांनी तपास पूर्ण करून आरोपी सोनू आतला याच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्ष, पुरावे तपासून व दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी भादंविचे कलम ३०२ अन्वये आरोपी सोनू आतला यास जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास पुन्हा सहा महिन्यांची शिक्षा न्यायाधीश शिंदे यांनी सुनावली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.
(स्थानिक प्रतिनिधी)