शैक्षणिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करू- कल्याणकर

By Admin | Updated: September 8, 2015 03:46 IST2015-09-08T03:46:00+5:302015-09-08T03:46:00+5:30

गडचिरोली, चंद्रपूरची उर्वरित महाराष्ट्राशी असलेली शैक्षणिक विषमता कमी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या

Let's try to reduce the gap in educational disparity: Kalyankar | शैक्षणिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करू- कल्याणकर

शैक्षणिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करू- कल्याणकर

गडचिरोली : गडचिरोली, चंद्रपूरची उर्वरित महाराष्ट्राशी असलेली शैक्षणिक विषमता कमी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कल्याणावर भर देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे नव नियुक्त कुलगुरू डॉ. नामदेव व्यंकटराव कल्याणकर यांनी सोमवारी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात सायंकाळी त्यांचा पदग्रहण व मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा निरोप सोहळा पार पडला. यावेळी डॉ. कल्याणकर बोलत होते.
यावेळी मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर, विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य समीर केने व विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विवेक जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी कुलगुरूंच्या कक्षात मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांना कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविला. त्यानंतर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांचे मावळते कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी डॉ. चांदेकर यांचाही डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मावळते कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले, विद्यापीठे हे केवळ विद्यार्थ्यांना पदवी देण्यापूर्ती मर्यादित राहू नये. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या संस्कृतीवर केंद्र निर्माण होणे गरजेचे आहे. याशिवाय जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या वन व नैसर्गिक साधनसंपदेवर कौशल्य अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नवनियुक्त कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी कोणत्याही संस्था या माणूस व पदांपेक्षा मोठ्या असतात. याची जाण ठेवून गोंडवाना विद्यापीठाचा लौकीक महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी आपण जोरकस प्रयत्न करू, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विनायक इरपाते तर संचालन डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)

असे आहेत नवे कुलगुरू
४डॉ. नामदेव कल्याणकर यांची शिक्षण क्षेत्रात ३४ वर्षांची सेवा झाली असून व्यवस्थापनाचा त्यांना १९ वर्षांचा अनुभव आहे. भौतिक व संगणकशास्त्रात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. विज्ञान शाखेतील पद्व्युत्तर, पदवीसह डीएचई व आचार्य पदवी त्यांनी मिळविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात नऊ विद्यार्थ्यांनी आचार्य व १८ विद्यार्थ्यांनी एमफील पदवी घेतली आहे. ७५ रिसर्च पेपर आणि दोन पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहे. सायबर क्राईम या विषयावर त्यांनी बहुमोल असे संशोधनाचे कामही केलेले आहे.

Web Title: Let's try to reduce the gap in educational disparity: Kalyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.