जातीचा उल्लेख करून दाखले द्या
By Admin | Updated: September 2, 2014 23:45 IST2014-09-02T23:45:56+5:302014-09-02T23:45:56+5:30
महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला शासकीय नोकरी व शिक्षणात पाच टक्के आरक्षण घोषित केल्यानंतर त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून जातीचे दाखले वितरीत करण्यात येत आहेत.

जातीचा उल्लेख करून दाखले द्या
अहेरी : महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला शासकीय नोकरी व शिक्षणात पाच टक्के आरक्षण घोषित केल्यानंतर त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून जातीचे दाखले वितरीत करण्यात येत आहेत. मात्र या दाखल्यांवर मुस्लिम या जातीचा उल्लेख न करताच दाखल्यांचे वाटप करण्यात येत आहे. या दाखल्यांवर जातीचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी अहेरी येथील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्यामार्फतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे हा समाज विकासापासून वंचित राहिला होता. शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाअभावी या समाजातील युवकांना स्पर्धा करणे, कठीण होते. त्यामुळे मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पुढे येऊ लागली होती. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला शासकीय नोकरीमध्ये यावर्षीपासून ५ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी युवकांकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार जात प्रमाणपत्रांचे विरतण करण्यात येत आहे. मात्र त्यावर जातीचा उल्लेख न करता शेख, सय्यद, पठाण अशा ५० घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनाने जे परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकात सुद्धा जातीच्या रकान्यात शेख, सय्यद, पठाण असा उल्लेख करावा, असे सुचविण्यात आले आहे. असे दाखले चुकीचे असल्याने अशा प्रकारचे दाखले देणे बंद करावे, अशी मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना शिष्टमंडळातील राकॉचे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष जमीर हकीम व काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष महेबूब अली यांनी शेख, सय्यद, पठाण ही आडनावे असून जात मुस्लिम किंवा मुसलमान हे उपविभागीय अधिकाऱ्यांना पटवून दिले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबीचे समर्थन केले. सदर दाखले सदोष असल्याचे दिसून आल्याने अशाप्रकारचे जातीचे दाखले बंद करण्यात आले आहे. याबाबत जात पडताळणी समितीकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्राप्त निर्देशानंतर जातीचे दाखले देण्यात येतील असे आश्वासन दिले.
या संदर्भात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार व राज्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याचे जमीर हकीम यांनी सांगितले. शिष्टमंडळात जमीर हकीम, महेबुब अली, जाफर अली, इरफान शेख, अफसर खान, शगीर शेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)