पोलीस जवानांनी गिरविले योगाचे धडे
By Admin | Updated: June 19, 2016 01:16 IST2016-06-19T01:16:42+5:302016-06-19T01:16:42+5:30
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने पोलीस ...

पोलीस जवानांनी गिरविले योगाचे धडे
पोलीस मुख्यालयात शिबिर : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य
गडचिरोली : २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य धाम येथे शुक्रवारपासून योग व प्राणायम शिबिराला प्रारंभ झाला आहे. या शिबिराच्या माध्यमातून पोलीस जवान व कर्मचारी योगाचे धडे गिरवीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस जवान व कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवनमान अतिशय ताणतणाव व धकाधकीचे असून बहुतांश कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्या कुटुंबीयांपासून अलिप्त राहावे लागते. परिणामी अशा कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढते. सदर बाब गंभीर असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताणतणाव कसे घालविता येईल, तसेच सकारात्मकदृष्ट्या आनंदी जीवन कसे जगता येईल, या उद्देशाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी योग व प्राणायम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात योग प्रशिक्षक हेमंत सेता व माधुरी या पोलीस जवानांना योग व प्राणायमचे प्रशिक्षण देत आहेत. या शिबिरात पोलीस मुख्यालय तसेच जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांमधून जेटीएससी प्रशिक्षणासाठी आलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत. वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक व शारीरिक बदल घडवून त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने प्राणायम शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिराचा समारोप २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनी करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)