भात प्रक्रिया उद्योगाचे धडे
By Admin | Updated: March 2, 2016 01:53 IST2016-03-02T01:53:08+5:302016-03-02T01:53:08+5:30
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोली, आत्मा व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने भात प्रक्रिया उद्योग विषयावर ....

भात प्रक्रिया उद्योगाचे धडे
महिलांनी जाणली माहिती : उद्योग उभारणी, धानावरील रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोली, आत्मा व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने भात प्रक्रिया उद्योग विषयावर पाच दिवसीय प्रशिक्षण येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात पार पडले. मंगळवारी येथे भात प्रक्रिया उद्योगावर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी भात प्रक्रिया उद्योगाचे धडे गिरविले.
यावेळी मंचावर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे, डॉ. एस. एल. बोरकर, डी. एन. अनोकार, विजय अरगडे, गृहविज्ञान विषयाच्या विशेषतज्ज्ञ डॉ. योगिता सानप आदी उपस्थित होते. याप्रसंगी विजय अरगडे यांनी गटबांधणी व उद्योग उभारणी या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. एस. पी. लांबे यांनी उद्योजकता विकास कौशल्य व उद्योग उभारणीतील विविध टप्पे याबाबत माहिती दिली. डॉ. श्रीकांत ब्राम्हणकर यांनी धानावर होणाऱ्या रोगाच्या प्रादुर्भावाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. एस. एल. बोरकर यांनी धान पिकावरील कीड व विविध प्रकारच्या रोगाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. डी. एन. अनोकार यांनी धान लागवड, तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. डॉ. संदीप कांबडी यांनी भात पिकाच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विविध वाण याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. योगिता सानप यांनी भाताचे मूल्यवर्धीत पदार्थ, पोहे निर्मिती, मुरमुरा निर्मिती व भात प्रक्रिया उद्योगातील विविध समस्या या विषयी मार्गदर्शन केले. दरम्यान प्रशिक्षित महिलांना पुलखल येथील बाबुराव सारवे यांच्या शेतावर सगुणा भात पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ येथील मुरमुरा मिलमधील तांदळावरील प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय अरगडे, संचालन प्रा. योगिता सानप यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)