वैनगंगा नदी पात्रात बिबट्या मृतावस्थेत
By गेापाल लाजुरकर | Updated: January 27, 2025 21:53 IST2025-01-27T21:53:28+5:302025-01-27T21:53:28+5:30
काेटगल बॅरेज परिसर : वाहत आल्याचा संशय

वैनगंगा नदी पात्रात बिबट्या मृतावस्थेत
गाेपाल लाजूरकर, गडचिरोली : शहरापासून ७ किमी अंतरावरील वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेज परिसरात सोमवार, २७ जानेवारी राेजी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. सदर बिबट्याचा पाण्यावर तरंगत हाेता.
गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या कोटगल गावाजवळच्या वैगगंगा नदीवर कोटगल बॅरेजच्या निर्मितीचे काम सुरू आहे. येथे काहीजणांना साेमवारी बिबट्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच क्षेत्र सहायक श्रीकांत नवघरे, वनरक्षक राठोड, प्राथमिक प्रतिसाद दल (पीआरटी टीम) आदींना घटनास्थळी रवाना करण्यात आले, तसेच गडचिरोली वनविभागाचे सहायक वनसंरक्षक प्रवीण पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकेल, असे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अवयव शाबूत
मृत बिबट्या ३ ते ५ वर्षांचा असून पाण्यात राहिल्यामुळे त्याचा मृतदेह फुगलेला हाेता. सतत पाण्यात राहिल्याने मृतदेहाची बरीचशी त्वचा निघाली होती. मात्र त्याचे सगळे दात, नखे, मिशा शाबूत दिसून आल्या. ३ बिबट्यांचा जिल्ह्यात महिनाभरात मृत्यू झाला.