परिवहन महामंडळाच्या बसगाडीतून आमदारांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:18 IST2016-03-04T01:18:51+5:302016-03-04T01:18:51+5:30
सर्वसामान्य कार्यकर्त्यातून आमदार झालेले आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार क्रिष्णा गजबे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या ...

परिवहन महामंडळाच्या बसगाडीतून आमदारांचा प्रवास
आठ वेळा केला प्रवास : सर्वसामान्य प्रवाशांशीही केली हितगूज
गडचिरोली : सर्वसामान्य कार्यकर्त्यातून आमदार झालेले आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार क्रिष्णा गजबे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीतून ब्रह्मपुरी ते नागपूर व नागपूर ते गडचिरोली असा प्रवास केला. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा त्यांचा महाराष्ट्राच्या लोकवाहिनीतून आठवा प्रवास आहे, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीमध्ये आसन क्रमांक एक व दोन हे खासदार व आमदार यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. परंतु राज्याची लोकवाहिनी समजणाऱ्या या बसगाडीतून अलिकडे तरी कुणी खासदार, आमदार प्रवास करताना सर्वसामान्य प्रवाशांना दिसत नाही. एकदा पदावर निवडून आल्यानंतर विमान किंवा रेल्वे याशिवाय खासदार, आमदारांचा प्रवास होत नाही. परंतु याला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे अपवाद ठरले आहे. आमदार पदावर निवडून आल्यापासून क्रिष्णा गजबे यांनी वडसा ते नागपूर व नागपूर ते गडचिरोली दरम्यान किमान आठवेळा एसटी बसमधून प्रवास केला. २९ फेब्रुवारी रोजी ते ब्रह्मपुरी ते नागपूर या प्रवासाला एसटीनेच निघाले. त्यानंतर नागपूरवरून त्यांनी रेल्वेने मुंबई गाठली. त्यानंतर आपले काम आटोपून गुरूवारी ते नागपूरात परत आले. सकाळी ८ वाजता नागपूर बसस्थानकावर पोहोचून त्यांनी गडचिरोलीसाठी बस पकडली व बसने ते गडचिरोलीत दाखल झाले. त्यानंतर ते वडसाकडे रवाना झाले. या संदर्भातील माहिती लोकमतला मिळाल्यावर त्यांच्याशी संवाद साधला. तर ते म्हणाले. आपण ग्रामीण भागातून पुढे आलेला कार्यकर्ता आहो. मातीशी आपले नाते अजुनही कायम आहे. पद येतील व जातील. आपल्या जीवनशैलीत कोणताही बदल होऊ न देता लोकांच्या समोर आपण गेलो पाहिजे, ही आपली कायम भूमिका राहिली आहे. त्यामुळे मी अनेकदा एसटीने प्रवास करूनच जातो. या प्रवासादरम्यान सर्वसामान्य नागरिक सहप्रवासी असतात. साहेब तुम्ही एसटीने कसे, असे ते आश्चर्याने विचारतात. एसटी विषयीच्या अडचणीही ते सांगतात, असे ते म्हणाले. अलिकडच्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर निवडून आलेला पदाधिकारी एसटीने प्रवास करीत नाही. असा अनुभव असताना क्रिष्णा गजबे यांचा हा एसटीचा प्रवास सामान्य प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का देणारा आहे.