व्यसनाधीन होऊन मरण्यापेक्षा अन्यायाविरूद्ध लढण्यास शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 01:45 IST2016-03-30T01:45:30+5:302016-03-30T01:45:30+5:30
देशाचे भवितव्य असलेली युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित असल्याचे विदारक चित्र आहे.

व्यसनाधीन होऊन मरण्यापेक्षा अन्यायाविरूद्ध लढण्यास शिका
हेमलकसात रासेयो शिबिर : अनिकेत आमटे यांचे आवाहन
भामरागड : देशाचे भवितव्य असलेली युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित असल्याचे विदारक चित्र आहे. परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. व्यसनाधीन होऊन मरण्यापेक्षा अन्यायाविरूद्ध लढण्यास शिका, असे आवाहन लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांनी केले.
राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालय भामरागडच्या वतीने हेमलकसा येथे सोमवारी आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रमोद घोनमोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे व्यवस्थापक दासरी, चिन्ना महाका, प्रा. संतोष डाखरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कैलास निखाडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अनिकेत आमटे म्हणाले, जिल्ह्यातील युवा पिढीमध्ये दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. युवा पिढी व्यसनामध्ये आपली ऊर्जा विनाकारण खर्ची घालत आहे. व्यसनात गुरफटण्यापेक्षा युवकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची गरज आहे, असेही आमटे यावेळी म्हणाले.
युवकांनी समाजसेवेचे व्रत घेऊन जीवन जगावे, असे प्रा. घोनमोडे यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. डॉ. कैलास निखाडे, संचालन सोनाली धानोरकर यांनी केले तर आभार सुनील दुर्गे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)