अहेरीत राकाँचे साखळी उपोषण
By Admin | Updated: January 23, 2016 01:36 IST2016-01-23T01:36:42+5:302016-01-23T01:36:42+5:30
सन २००५ च्या नियमानुसार वनहक्क पट्टे मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केलेल्या सर्व आदिवासी व गैरआदिवासी

अहेरीत राकाँचे साखळी उपोषण
प्रमुख मागणी : प्रस्ताव सादर केलेल्या अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे द्या
अहेरी : सन २००५ च्या नियमानुसार वनहक्क पट्टे मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केलेल्या सर्व आदिवासी व गैरआदिवासी अतिक्रमणधारकांना तत्काळ वनहक्क पट्टे द्यावेत, या मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी साखळी उपोषण करण्यात आले.
उपोषणापूर्वी अतिक्रमणधारकांच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यात यावे, मुदतीनंतरही सादर केलेले वनहक्क दावे मंजूर करावे व गैरआदिवासींना वनहक्क पट्टे मिळण्यासाठीची तीन पिढ्यांच्या अटीमध्ये शिथीलता आणावी, या मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढू, असे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम व उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी राकाँचे अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, येर्रावार, सुरेंद्र अलोणे, ग्रा.पं. सदस्य सुधाकर आत्राम, लक्ष्मण डोंगरे, पांडु गावडे, बुचय्या चडमेक, सदू पेंदाम, लक्ष्मी पोदाडी, भगवान मडावी, रंगा आलाम, नारायण चालुरकर, कमला वेलादी, बंडू झाडे, नारायण आत्राम, मधुकर झाडे, सरपंच अंजना मडावी, सुरेश वेलादी, व्यंकटेश झोडे, समय्या टेकाम, लिंगू वेलादी, पोचू आत्राम, रंगा तलांडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)