स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ
By Admin | Updated: October 1, 2014 23:23 IST2014-10-01T23:23:48+5:302014-10-01T23:23:48+5:30
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात २ ते ३० आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छ भारत अभियान राबविला जात असून या अभियानाची सुरूवात आरमोरी येथील महात्मा गांधी कला,

स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ
आरमोरी : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात २ ते ३० आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छ भारत अभियान राबविला जात असून या अभियानाची सुरूवात आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात १ आॅक्टोबर रोजी करण्यात आली.
भारत सरकारचा मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महात्मा गांधी जयंतीच्या पूर्व संधेला महाविद्यालयाच्या इमारतीची व परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियान २ ते ३० आॅक्टोबर दरम्यान राबविल्या जाणार आहे. या कालावधीत ग्रामस्वच्छता, स्वच्छताविषयक प्रतिज्ञा, भित्तीचित्र प्रदर्शनी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा, सार्वजनिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन या संदर्भात प्रकल्प निर्मिती, व्याख्यानसत्र, परिसंवाद, पथनाट्य, स्वच्छता रॅली, गांधी संस्कार परीक्षा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे सर्व कार्यक्रम प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात राबविले जाणार आहेत. १ आॅक्टोबर रोजीचे स्वच्छता अभियान राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे, प्रा. अमिता बन्नोरे, प्रा. डॉ. विजय गोरडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. सदर अभियान यशस्वीतेसाठी डॉ. गोपाल तामगाडे, डॉ. विशाखा वंजारी, प्रा. सुरेश रेहेपाडे, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. डॉ. रमेश ठोंबरे, प्रा. किशोर हजारे, प्रा. जयेश पापडकर, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. पराग मेश्राम, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. डॉ. वसंता कहालकर, प्रा. डॉ. विजय रैवतकर, हिरालाल मगरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
घर व परिसरात असलेल्या अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा प्रसार होतो. मात्र याबाबत नागरिकांमध्ये फारशी जनजागृती निर्माण झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रत्येक महाविद्यालयाला सदर कार्यक्रम राबविणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात स्वच्छतेची मोहीम छेडली जाणार आहे. याचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)