पोलीस दलातर्फे प्रतिसाद अॅपचा शुभारंभ
By Admin | Updated: March 9, 2016 02:24 IST2016-03-09T02:24:26+5:302016-03-09T02:24:26+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे मंगळवारी येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम....

पोलीस दलातर्फे प्रतिसाद अॅपचा शुभारंभ
पोलीस महानिरिक्षकांची उपस्थिती : महिलांना तत्काळ मिळणार पोलीस मदत
गडचिरोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे मंगळवारी येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम यांच्या हस्ते महिलांच्या मदतीसाठी प्रतिसाद अॅपचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले, राज्याचे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्यासंकल्पनेतून हे अॅप सुरू करण्यात आले असून ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्रात लागू असणार आहे. राज्यातील कोणत्याही ठिकाणी महिला व नागरिक या अॅपचा उपयोग करू शकतात. मोबाईल अँड्राईड अॅपचा जिल्ह्यातील महिला व नागरिकांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन संदीप पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला देशपांडे सहायक पोलीस निरिक्षक चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक रावडे, इघाटे, महिला पोलीस उपनिरिक्षक तेजस्वी पाटील, यशोदा कणसे व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)
असा करा, प्रतिसाद अॅपचा उपयोग
सर्व प्रथम आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर्स मध्ये जा, गुगल प्ले स्टोअरमध्ये गडचिरोली पोलीस असे टाईप करून सर्च करा, त्यानंतर प्रतिसाद अॅप सिलेक्ट करा, सदर अॅप डाऊनलोड करून इंस्टाल करा व त्यानंतर त्यात आपले नाव, मोबाईल क्रमांक रजिस्टर करा, सदर अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर लाल रंगामध्ये हेल्प आॅयकॉन दिसेल. ज्यावेळी तुम्हाला पोलिसांची तत्काळ मदत आवश्यक मदत आवश्यक असेल तेव्हा हेल्प आॅयकॉन क्लिक करा, त्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी संपर्क करतील.