मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने लोह प्रकल्पांना चालना

By Admin | Updated: November 21, 2015 01:53 IST2015-11-21T01:53:09+5:302015-11-21T01:53:09+5:30

मागील दहा ते पंधरा वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात लोह प्रकल्पाचे काम रखडलेले होते. माओवाद्यांच्या दहशतीमुळे या भागात येण्यास उद्योजक तयार होत नव्हते. माओवाद्यांनी काही उद्योजकांची हत्याही केली.

Launch of Iron Projects by the Chief Minister's initiative | मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने लोह प्रकल्पांना चालना

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने लोह प्रकल्पांना चालना

लक्ष्मी मित्तल यांना गडचिरोलीसाठी आमंत्रण : १० ते १५ वर्षांपासून रखडला सूरजागड प्रकल्प
गडचिरोली : मागील दहा ते पंधरा वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात लोह प्रकल्पाचे काम रखडलेले होते. माओवाद्यांच्या दहशतीमुळे या भागात येण्यास उद्योजक तयार होत नव्हते. माओवाद्यांनी काही उद्योजकांची हत्याही केली. त्यामुळे अनेकांनी लीज मिळूनही या भागातून आपला गाशा गुंडाळला होता. राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाल्यावर गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी पुढाकार घेण्यात आला.
अलिकडेच लंडन भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भेट घेतली व त्यांना गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी आमंत्रित केल्याची माहिती टिष्ट्वटवरून दिली. त्यामुळे गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला आता आगामी काळात चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली, सूरजागड, कोरची तालुक्यात झेंडेपार, मसेली, अहेरी तालुक्यात देवलमरी आदी भागात लोह खनिज व सिमेंटचे साठे आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने दहा वर्षांपूर्वी या भागात उद्योजकांना लोह खनिजासाठी लीज मंजूर केली होती. काही उद्योजकांनी येथे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माओवाद्यांचा याबाबीला विरोध राहिला. अशातच दोन उद्योजकांची हत्या झाली. त्यामुळे या भागात लीज घेतलेल्या लोहखनिज कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला.
राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आॅगस्ट २०१५ मध्ये दिल्ली येथे गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाबाबत बैठक आयोजित केली. उद्योजकांना पोषण वातावरण निर्माण करण्यासाठी गृह विभाग आवश्यक ते सहकार्य राज्य सरकारला करेल, असे सुतोवाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्याशी मुंबई येथे बैठक घेऊन त्यांना गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याबाबत आमंत्रित केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने एटापल्ली, भामरागड व एकूणच नक्षलग्रस्त भागात पोषण वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले आहे.
या भागात येत्या काही दिवसात पॅरामिल्ट्री फोर्सेस तैनात केले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अलिकडे लंडन येथे मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मी मित्तल या उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना सूरजागड भागात लोहखनिज उद्योग सुरू करण्यासाठी साकडे घातले. गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे मार्ग तसेच रस्ते विकासाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलले आहे. जानेवारी महिन्यात रेल्वे मार्ग व महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करून आगामी तीन वर्षात हे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औद्योगिक वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे पुढील काळात गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता जानकारांकडून व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Launch of Iron Projects by the Chief Minister's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.