पोर्ला येथील ऐतिहासिक वाडा मोजतोय अखेरची घटका

By Admin | Updated: June 21, 2015 02:09 IST2015-06-21T02:09:50+5:302015-06-21T02:09:50+5:30

गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वाडा आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने या ऐतिहासिक वाड्याची देखभाल व दुरूस्ती होत नसल्याने सदर वाडा आता पावसाळ्यात पडझडीच्या मार्गावर आहे.

The last moment of measuring the historical castle at Portela | पोर्ला येथील ऐतिहासिक वाडा मोजतोय अखेरची घटका

पोर्ला येथील ऐतिहासिक वाडा मोजतोय अखेरची घटका

पडझडीच्या मार्गावर : विविध ऐतिहासिक घटनांची देतो साक्ष
संजय येवले  पोर्ला
गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वाडा आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने या ऐतिहासिक वाड्याची देखभाल व दुरूस्ती होत नसल्याने सदर वाडा आता पावसाळ्यात पडझडीच्या मार्गावर आहे. पोर्लाचा ऐतिहासिक नबाबवाडा सध्या अखेरची घटका मोजत असल्याचे दिसून येते.
पोर्ला येथे ब्रिटिशकाळात नबाब असफअल्ली नावाचे जमिनदार वास्तव्यास होते. जमिनदार नबाब असफअल्ली यांच्याकडे पोर्लापासून वैरागडपर्यंतच्या एकूण ५२ गावांची मालगुजारी जमिनदारी होती. नबाबाकडे महसुली व प्रशासनीय अधिकारांसोबतच न्यायदानाचेही अधिकार होते. न्यायदानासाठी ब्रिटिशकाळात पोर्ला येथे स्वतंत्र न्यायालय व कारागृह होते. ब्रिटिशकाळात वन्य संरक्षण कायदा नसल्याने जंगली प्राण्यांच्या शिकारिला परवानगी होती. त्यामुळे डेन्मार्क, स्विडन, इंग्लड, मलेशिया आदीसह अनेक परदेशातील पर्यटक वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी पोर्ला येथे येत होते. तसेच पोर्लाच्या नबाब वाड्यात परदेशातील पर्यटक मुक्कामी राहायचे. विदेशी शिकारी पर्यटकांसाठी पोर्ला येथील नबाब वाड्यात अद्यापही स्वतंत्र दिवाणखाना उपलब्ध आहे. कालांतराने स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सरंजामशाही नष्ट झाली. त्यामुळे नबाबाची पुढची पिढी भारतातल्या विविध शहरात स्थलांतरीत झाली. नबाबाच्या पिढीतील कुणीही पोर्ला येथे राहत नसल्याने पोर्ला येथील ऐतिहासिक नबाब वाडा ओस पडला असून सध्या भग्नावस्थेत आहे.
पोर्लाच्या ऐतिहासिक नबाब वाड्यातून अनेक घटनांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐतिहासिक काळातील विविध घटनांची साक्ष पोर्लाचा सदर नबाब वाडा अद्यापही देतो. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सध्या सदर नबाब वाडा पडझडीच्या मार्गावर असून अखेरची घटका मोजत आहे. पूर्वी पोर्लाचा ऐतिहासिक नबाब वाडा पाहण्यासाठी अनेकजण पोर्ला येथे येत होते. त्यावेळी नबाब वाड्याचे महत्त्वही मोठे होते.
पोर्ला परिसरातील बीएसएनएल सेवा ठप्प
पोर्ला परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची भ्रमणध्वनी सेवा कव्हरेजअभावी ठप्प झाली आहे. पोर्ला येथे बीएसएनएलच्या वतीने मनोरा उभारण्यात आला. या मनोऱ्याच्या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार ग्राहक बीएसएनएलच्या भ्रमणध्वनी सेवेचा लाभ घेत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हलक्याशाही वादळाने पोर्ला परिसरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. वीज पुरवठा खंडीत होताच बीएसएनएलचे कव्हरेज राहत नाही. बीएसएनएलच्या बॅटरीचे संच कुचकामी झाले असून कव्हरेज नसल्याची समस्या वारंवार उद्भवत आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक कमालीचे त्रस्त झाले आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी पोर्ला येथील मनोऱ्यात नवीन बॅटरी संच कार्यान्वित करून बीएसएनएलची सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आहे. यासंदर्भात पोर्ला येथील काही भ्रमणध्वनीधारकांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनही दिले आहे.

Web Title: The last moment of measuring the historical castle at Portela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.